मेट्रोचे प्रस्तावित स्मार्ट कार्ड कोणत्याही प्रवासाला चालणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 05:30 PM2020-07-22T17:30:29+5:302020-07-22T17:30:54+5:30
रोख पैशांची गरज नाही: मेट्रो स्थानकापर्यंत येण्यासाठी उपयोग
पुणे: कोरोना टाळेबंदीमुळे संथ गतीने सुरू असलेल्या रस्त्यावरच्या कामाची कसर महामेट्रोने अन्य कामांमधून भरून काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मेट्रोच्या तिकीटासाठी असलेले स्मार्ट मी कार्ड आता शहरातंर्गत कशानेही केलेल्या प्रवासासाठी चालेल अशी रचना करण्याचे संबधित निविदाधारकास सांगण्यात आले आहे.
मेट्रोच्या तिकीटासाठी मेट्रो स्मार्ट मी कार्ड वितरीत करणार आहे. निविदेद्वारे हे काम एका बँकेला देण्यात आले आहे. मेट्रोमध्ये हे कार्ड यंत्रावर स्वाइप केले की त्यातून तिकीटाच्या दराचे पैसे वजा होतील.
हेच कार्ड आता मेट्रोकडे येणाऱ्या रिक्षा किंवा अन्य कोणत्याही प्रवासी वाहनासाठी वापरता येणार आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागातून मेट्रोच्या नजिकच्या स्थानकाजवळ येणे सुलभ व्हावे यासाठी मेट्रो विशिष्ट प्रकारची विद्यूत वाहने वापरणार आहे. त्या वाहनांना, स्थानिक रिक्षा,पीएमपी अशा सर्व वाहनांसाठी हे स्मार्ट मी कार्ड उपयोगी पडेल. प्रवाशांना तिकीटासाठी म्हणून रोख पैसे बाळगण्याची गरज पडणार नाही.
स्मार्ट मी कार्ड तयार करण्याचे काम घेतलेल्या बँकेला याबाबतच्या सुचना देण्यात आल्या असल्याचे महामेट्रो कडून सांगण्यात आले.---//
अनेक सुविधा देणार
मेट्रोकडून यासारख्या अनेक अत्याधुनिक सुविधा पुण्यात राबवण्यात येणार आहेत..कोरोना मुळे मेट्रोचे रस्त्यावरचे मार्ग ऊभारणीचे काम थोडे संथ झाले आहे. मेट्रो स्थानके सुरू झाल्यानंतर या स्मार्ट मी कार्ड सुविधेचा खरा ऊपयोग होईल.
डॉ. रामनाथ सुब्रम्हण्यम
संचालक, महामेट्रो, पुणे.
.....