ʻम्हाडाʼने घर दिले, मात्र बिल्डरने रस्ता रखडवला; पुण्यातला धक्कादायक प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:11 AM2021-03-24T04:11:40+5:302021-03-24T14:15:50+5:30
दीपक मुनोत - पुणे : ʻकुणी घर देतं का घर...ʼ असा आर्त टाहो फोडणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील काही ...
दीपक मुनोत -
पुणे : ʻकुणी घर देतं का घर...ʼ असा आर्त टाहो फोडणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील काही नशीबवान गरजवंतांना ʻम्हाडाʼची लॉटरी लागली. मात्र ʻगोयल गंगाʼ बिल्डर या भाग्यवंतांना त्यांच्या सदनिकांपर्यंत पोहचण्यासाठी रस्ताच देत नसल्यामुळे लाभार्थी हतबल झाले आहेत. याबाबत, ʻम्हाडाʼने ʻगोयल गंगाʼ बिल्डरला सक्त ताकीद देणारी नोटीस बजावली आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा, यासाठी ʻपुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा, पुणे)ʼ, वतीने सोडत योजना (लकी ड्रॉ) राबविण्यात येते. त्यानुसार, सप्टेंबर २०१९ मध्ये राबविलेल्या लकी ड्रॉ मध्ये ५२ लाभार्थ्यांना, ʻगोयल गंगा ʼ बिल्डर यांच्या धानोरी येथील गोयल गंगा स्पेस या संकुलात सदनिका मिळाल्या.
या संकुलामध्ये, ए, बी, सी आणि डी या इमारती आहेत. त्यापैकी ʻसीʼ इमारत ही म्हाडा लाभार्थ्यांना बहाल केली आहे. ʻसीʼ वगळता अन्य तिन्ही इमारतींना, भरत ढाबा येथून असलेल्या विकास आराखड्यातील रस्त्याने प्रवेश दिला आहे. मात्र, म्हाडा लाभार्थ्यांच्या ʻसीʼ इमारतीला मुंजाबा वस्ती येथून प्रवेश दिला आहे. नेमक्या याच रस्त्यावर स्थानिक रहिवाशांनी अतिक्रमण केल्यामुळे त्याबाजूने केवळ पायवाट, उरल्याचे म्हाडाच्या नोटीसमध्ये नमूद केले आहे. काही ठिकाणी हा रस्ता ६ मीटर रूंद आहे. त्यामुळे म्हाडा लाभार्थी, या रस्त्याने दुचाकी किंवा चारचाकी वाहन नेऊ शकत नसल्याचेही, निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे, रस्ता हा अडचणीचा आणि धोकादायक असल्याचेही नमूद केले आहे.
म्हाडाच्या या सोडतीनुसार, या सर्व सदनिकांचा ताबा डिसेंबर २०१९ मध्ये देणे अपेक्षित होते. त्यास वर्षभराची मुदतवाढ दिली. ती मुदत टळून गेली आहे तरीदेखील लाभार्थ्यांना सदनिकांचा ताबा मिळालेला नाही, याकडेही नोटीसमध्ये लक्ष वेधले आहे.
म्हाडा लाभार्थ्यांनी, गोयल गंगा बिल्डरला सदनिकांपोटी संपूर्ण रक्कम अदा केल्याचे, निदर्शनास आणून नोटीसमध्ये म्हटले आहे की, लाभार्थ्यांनी काढलेल्या कर्जापोटी बँकांचे कर्जफेडीचे हप्ते सुरू झाले आहेत. दुसरीकडे, सदनिकांचा ताबा न मिळाल्याने, लाभार्थ्यांना ते सध्या राहत असलेल्या घरांचे भाडे भरावे लागत आहे.
या संपूर्ण पार्श्वभूमीवर, म्हाडा विजेत्यांना, त्यांच्या सदनिकांकडे जाणारा रस्ता त्वरित उपलब्ध करून द्यावा तसेच त्यांच्या सदनिकांचाही तातडीने ताबा द्यावा, अशी ताकीद ʻगोयल गंगाʼ बिल्डरला दिली आहे.
म्हाडाचे पुणे विभागाचे मुख्य अधिकारी, नितीन माने यांच्या स्वाक्षरीने कंपनीचे सुभाष सीताराम गोयल आणि अग्रिम बिशांभर गोयल यांना नोटीस बजावली आहे.
महापालिका अभियंत्यांची हलगर्जी
गोयल गंगा बिल्डरने बांधकाम नकाशे सादर करताना मुंजाबा वस्तीकडील रस्ता दर्शवला आहे. तो रस्ता नसून केवळ पायवाट शिल्लक राहिली असताना, महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाने नकाशे मंजूर केल्यामुळे, म्हाडा लाभार्थ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे, बांधकाम नकाशे बेकायदा मंजूर करणाऱ्या अभियंत्यांवर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
..........
गोयल गंगा बिल्डरने बांधकाम परवाना घेताना संबंधित रस्ता सहा मीटर रूंद असल्याचे दर्शवले होते. मात्र तो प्रत्यक्षात तीन-साडेतीन मीटर रूंद असल्याचे आढळून आल्याने आम्ही बिल्डरला काम थांबवण्याचे आदेश (स्टॉप वर्क नोटीस) दिले आहेत. तसेच सुधारीत नकाशे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
- नीळकंठ शीलवंत, प्रभारी उपअभियंता, पुणे महापालिका
........
मुंजाबा वस्तीच्या बाजूने येणारा रस्ता आम्ही म्हाडा लाभार्थींना दिला होता. मात्र, त्या रस्त्यावर गेल्या २/३ वर्षात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. ते काढण्यासाठी आम्ही पोलिसांकडे तक्रार दिली आहे. वास्तविक हा रस्ता सरकारी नसून तो खासगी ले आऊटमधील आहे. त्यामुळे त्याची मालकी स्थानिक रहिवाशांची होऊ शकत नाही. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे, रस्त्यासाठी आम्ही अन्य पर्यायही शोधत आहोत. ए, बी आणि डी बिल्डिंगच्या सोसायटीबरोबरही चर्चा करीत आहोत.
- सुभाष गोयल, गोयल गंगा बिल्डर
...........
गोयल गंगा बिल्डरकडून लाभार्थ्यांची गेल्या सहा महिन्यांपासून आश्वासनाद्वारे बोळवण सुरू असल्याने आम्ही बिल्डरला नोटीस बजावली आहे.
- नितीन माने, मुख्य अधिकारी, म्हाडा, पुणे