‘म्हाडा’चे तारीख पे तारीख; अर्जदारांसमोर तिढा! दोनदा मुदतवाढ, आता सोडतच पुढे ढकलली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 09:25 AM2023-11-24T09:25:39+5:302023-11-24T09:26:43+5:30
ही सोडत प्रशासकीय कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली असून, लवकरच अर्जदारांना त्याबाबत कळविण्यात येईल, असे ‘म्हाडा’ने कळविले आहे....
पुणे :पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात ‘म्हाडा’च्या पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील सदनिकांची सोडत पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत सुमारे ५ हजार ८६३ सदनिकांची सोडत शुक्रवारी (दि. २४) होणारी होती. ही सोडत प्रशासकीय कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली असून, लवकरच अर्जदारांना त्याबाबत कळविण्यात येईल, असे ‘म्हाडा’ने कळविले आहे.
अर्जांना प्रतिसाद कमी मिळाल्याने ‘म्हाडा’ने यापूर्वी दोनदा मुदतवाढ दिली होती. आता सोडत पुढे ढकलल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. ‘म्हाडा’च्या पुणे विभागाने या सोडतीसाठी पाच सप्टेंबरला ऑनलाइन अर्ज नोंदणी, तसेच अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली होती. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सुमारे साठ हजारांहून अधिक नागरिकांनी घरांसाठी अर्ज केले. रहिवासाच्या दाखल्यासाठी यापूर्वी ‘म्हाडा’ने दोनदा मुदतवाढ दिली होती.
या सोडतीत पुणे जिल्ह्यातील ५ हजार ४२५, सोलापूरमधील ६९, सांगलीतील ३२ व कोल्हापूर जिल्ह्यातील ३३७ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत, तसेच म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ४०३ सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत ४३१ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत २५८४ सदनिका व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत २४४५ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत, असे ‘म्हाडा’ने कळविले आहे.