म्हाडा पेपर फुटी प्रकरण; एजंटामार्फत देशमुख फोडणार होता पेपर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 08:02 PM2021-12-14T20:02:42+5:302021-12-14T20:02:52+5:30

जी ए सॉफ्टवेअरचा डॉ. प्रीतीश देशमुख याने म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी जवळपास १० एजंटांशी संपर्क केला होता

MHADA Paper leak case deshmukh was going to break the paper through an agent | म्हाडा पेपर फुटी प्रकरण; एजंटामार्फत देशमुख फोडणार होता पेपर

म्हाडा पेपर फुटी प्रकरण; एजंटामार्फत देशमुख फोडणार होता पेपर

Next

पुणे : जी ए सॉफ्टवेअरचा डॉ. प्रीतीश देशमुख याने म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी जवळपास १० एजंटांशी संपर्क केला होता. त्यांच्यामार्फत तो पेपर फोडण्याचा त्याचा कट असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या एजंटांनी परीक्षार्थींशी संपर्क साधून त्यांना पेपर कोरा साेडण्यास सांगण्यात येणार होते. त्यानंतर ओएमआरशीटमध्ये देशमुख फेरफार करुन त्या परिक्षार्थींना पास करण्यात येणार होते. हा त्यांचा बदलेला प्लॅन होता. दरम्यान, या प्रकरणी अटक करण्यात आलेले संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांनी आपल्या अटकेविरोधात सत्र न्यायालयात दाद मागितली.

४ पेन ड्राईव्ह, टॅब, मोबाईल जप्त

सायबर पोलिसांनी डॉ. देशमुख याच्या खराळवाडी येथील घराची सोमवारी रात्री झडती घेतली. त्यात पोलिसांना ४ पेन ड्राईव्ह, एक टॅब, एक मोबाईल सापडला आहे. पोलिसांनी हे साहित्य जप्त केले असून या वस्तूंचा पंचनामा करुन पंचांसमोर री ओपन करुन पाहिल्यानंतर त्यामध्ये नक्की काय आहे हे समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.

आरोग्य पेपरफुटीनंतर बदलला प्लॅन

देशमुख याच्या जी. ए. सॉफ्टवेअर या कंपनीला म्हाडाची लेखी परीक्षा आयोजित करून तिचा निकाल पर्यंतचे सर्व कामाचे कंत्राट देण्यात आले होते. त्याच संधीचा फायदा घेत देशमुख याने राज्यभर पसरलेल्या आपल्या एजंट टोळीकडून परिक्षार्थीना हेरण्यास सुरूवात केली. देशमुख याने पेपर देण्याच्या बदल्यात एजंटाकडे एका परिक्षार्थीमागे दहा लाखांचा रेट ठरवला. मग एजंट संबंधीत परिक्षार्थीमागे किती पैसे घेणार, हे त्या एजंटवर अवलंबून होते. अगोदर एजंटांना पेपर देण्यात येणार होते. मात्र, आरोग्य विभागाच्या पेपरफुटीनंतर त्याने आपला प्लॅन बदलला. देशमुख हा ठरलेल्या परिक्षार्थ्यांना परीक्षेच्या दिवशी ओएमआर सीट (उत्तर पत्रिका) ठेवण्यास त्याने सांगितले होते. परिक्षार्थी मिळालेल्या परिक्षा केंद्रावर जाऊन केवळ त्याची संपूर्ण माहिती त्या उत्तरपत्रिकेवर भरणार होता. तसेच त्या उत्तर पत्रिका कोर्या ठेवण्याचे ठरले होते. पुढे या सर्व उत्तरपत्रिका देशमुख काम करीत असलेल्या कंपनीच्या ताब्यात येणार होत्या. उत्तरपत्रिका तपासण्याच्या वेळी एजंटमार्फत आलेल्या परिक्षार्थीच्या ओएमआरशीटमध्ये देशमुख गुण भरून फेरफार करणार होता. मात्र, ऐनवेळी पुणे पोलिसांनी पेपरफुटीचा माहिती मिळाली आणि देशमुखचा डाव फसला.

एजंट पोलिसांच्या रडारवर

प्रीतीश देशमुख व संतोष हरकळ, अंकुश हरकळ यांच्या संपर्कात असलेल्या एजंट आता पोलिसांच्या रडार आले आहेत. आतापर्यंत पोलिसांना १० एजंटविषयी माहिती मिळाली असून त्यांचा शोध घेतला जात आहे. ते ताब्यात आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार अधिक स्पष्ट होणार आहे.

अटकेला हरकत

आम्ही केवळ डॉ. प्रीतीश देशमुख याच्याबरोबर होतो, आमचा म्हाडा पेपरफुटीशी काहीही संबंध नाही. त्यामुळे सायबर पोलिसांनी आम्हाला अकारण अटक केली असल्याचा दावा करुन संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. याबाबत न्यायालयाने पोलिसांचे म्हणणे मागविले आहे. डॉ. देशमुख याच्याबरोबर दोघेही आरोपी होते. त्यांचा त्यात सहभाग आढळून आल्यामुळेच त्यांना अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी आपले म्हणणे न्यायालयात सादर केले आहे.

पेपरसाठी कोडवर्कचा वापर

डॉ. प्रीतीश देशमुख याने काही एजंटशी संधान साधले होते. त्यासाठी त्यांनी कोडवर्कचा वापर केला होता. त्यात त्यांनी घरातील वस्तू असे सांकेतिक शब्दांचा वापर केला होता. घर म्हणजे म्हाडा आणि वस्तू म्हणजे पेपर असा त्याचा अर्थ होता. प्रीतीश देशमुख याला ताब्यात घेतल्यानंतर काही एजंटचे फोन आले होते. त्यात त्यांनी घरातील वस्तू कधी मिळणार अशी विचारणा केली होती. त्याचा अर्थ म्हाडाचे पेपर कधी मिळणार असा होता. असे पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आले आहे.

Web Title: MHADA Paper leak case deshmukh was going to break the paper through an agent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.