म्हाडा पेपर फुटी प्रकरण; प्रीतिश देशमुखच्या जी ए सॉफ्टवेअरकडे होती २० पोलीस भरतीची जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 09:05 PM2021-12-13T21:05:01+5:302021-12-13T21:05:58+5:30
म्हाडाच्या परीक्षेबाबत पेपर तयार करण्यापासून ते निकाल जाहीर करण्यापर्यंतची जबाबदारी जी ए सॉफ्टवेअरकडे सोपविण्यात आली होती
पुणे : म्हाडा पूर्वपरीक्षेचे पेपर फोडणारा जी ए सॉफ्टवेअरचा प्रीतीश देशमुख याच्याकडे यापूर्वी राज्यातील २० पोलीस भरतीच्या परीक्षांची जबाबदारी होती. म्हाडाच्या परीक्षेबाबत पेपर तयार करण्यापासून ते निकाल जाहीर करण्यापर्यंतची जबाबदारी जी ए सॉफ्टवेअरकडे सोपविण्यात आली होती. त्याचा गैरफायदा घेऊन प्रीतीश देशमुखने हा पेपर फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु, पुणे पोलिसांच्या सायबर पथकाने हा पेपर परीक्षेपूर्वी परिक्षार्थीपर्यंत पोहचविण्यापूर्वीच त्याला ताब्यात घेऊन हा कट उधळला. त्याने हा पेपर आणखी कोणाला दिला आहे का, त्याला त्यासाठी काय आर्थिक व्यवहार होणार होता, याचा तपास सध्या सायबर पोलीस करीत आहेत.
शासनाने राज्यातील वेगवेगळ्या परीक्षा घेण्यासाठी पाच कंपन्यांची निवड केली आहे. त्यातील बंगलुरुची जी ए सॉफ्टवेअर ही एक कंपनी आहे. कंपनीची महाराष्ट्राची जबाबदारी प्रीतिश देशमुख याच्याकडे देण्यात आली आहे. तो २ वर्षांपासून कंपनीबरोबर काम करत आहे. त्याच्याबरोबर सापडलेला संतोष हरकळ याच्या गाडीवर अंकुश हा चालक म्हणून काम करतो. त्यांच्यामार्फत हा पेपर फोडण्याचा देशमुख याचा कट होता.
नवी मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद ग्रामीण, पुणे शहर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, नागपूर, वर्धा, भंडारा, औरंगाबाद शहर, औरंगाबाद कारागृह, सोलापूर आयुक्तालय अशा पोलीस विभागातील वेगवेगळ्या घटक दलाचे भरती परीक्षा घेण्याचे काम जी ए सॉफ्टवेअरकडे देण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने उमेदवारांना हॉल तिकीट देणे, पोलिसांकडून मिळणाऱ्या पेपरची पोलिसांच्या निगराणीखाली छपाई करणे, परीक्षा घेणे, पेपर जमा करणे, ते स्कॅन करुन गुण देऊन निकाल जाहीर करणे अशी जबाबदारी जी ए सॉफ्टवेअरवर होती. म्हाडा पूर्व परीक्षाबाबत मात्र, सर्व जबाबदारी जी ए सॉफ्टवेअरवर सोपविण्यात आली होती. त्यामुळे त्यांनीच पेपर तयार केले होते. ते त्याने स्वत: जवळ बाळगून म्हाडाबरोबर झालेल्या करारातील गाेपनीयतेचा भंग केल्याचे आढळून आले आहे.
म्हाडाच्या एक परिक्षेसाठी ३ पेपर सेट करण्यात आले होते. अशा ३ परिक्षेचे ९ सेट त्याच्याकडे पेन ड्राईव्हमध्ये मिळून आले आहे. सायबर पोलिसांनी आज त्याच्या घराची झडती घेतली. संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांच्याकडील मोबाईलवर म्हाडाच्या लेखी परिक्षेचे संदर्भात संशयास्पद संभाषण आढळून आले आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या संदर्भातील याद्या व इतर कागदपत्रे मिळाली आहेत.
क्लासचालकांची महत्वाची भूमिका
औरंगाबाद येथील टार्गेट करिअर पॉईटचा संचालक अजय चव्हाण आणि सक्षम ॲकॅडेमीचा संचालक कृष्णा जाधव आणि अंकित चनखोरे यांना आरोग्य पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांच्या क्लासला येणार्या विद्यार्थ्यांकडून त्यांची प्रवेश पत्रे, मुळ शैक्षणिक प्रमाणपत्रे, कोरे धनादेश घेत. पेपर दिल्यानंतर ते पास झाल्यानंतर त्यांच्याकडून ठरलेली रक्कम घेतल्यानंतर मुळ शैक्षणिक प्रमाणपत्रे परत करीत असत. अशी त्यांची मोडस समोर आली आहे. म्हाडा परिक्षेला बसणारे परिक्षार्थी यांची प्रवेश पत्रे तसेच आरोग्य विभागाच्या दोन्ही परिक्षेला बसलेल्या ५१ परिक्षार्थीची यादी त्यांच्याकडे सापडली आहे. त्यांनी ती का घेतली होती. या परिक्षार्थीबरोबर त्यांचा काय व्यवहार झाला होता, याचा तपास केला जात आहे.