म्हाडा अन् पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा एकाच दिवशी; हजारो विद्यार्थ्यांना फटका बसणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 11:41 AM2022-01-03T11:41:39+5:302022-01-03T11:41:59+5:30
म्हाडाची परीक्षा २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारी यादरम्यान होणार आहे. मात्र, २९ जानेवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक पदाची मुख्य परीक्षा आधीपासूनच जाहीर आहे. दोन्हीही परीक्षा देणाऱ्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे
पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील (म्हाडा) सरळसेवेने विविध संवर्गातील पदांची भरती परीक्षेची तारीख म्हाडाने पुन्हा एकदा नुकतीच जाहीर केली आहे. या परीक्षा २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारी यादरम्यान होणार आहे. मात्र, २९ जानेवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक पदाची मुख्य परीक्षा आधीपासूनच जाहीर आहे. दोन्हीही परीक्षा देणाऱ्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे.
१२ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत सुरुवातीला म्हाडाची परीक्षा जाहीर करण्यात आली होती. मात्र, परीक्षेच्या एक दिवस अगोदर पेपर फुटल्याची बातमी आल्याने परीक्षा रद्द करून पुढे ढकलल्याचे गृहनिर्मणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले होते. मात्र, आता पुन्हा परीक्षा जाहीर केली असून २९ जानेवारी या दिवशी इतर कोणत्या परीक्षा आहेत की नाही याची कोणतीही खातरजमा केली नसल्याचे एमपीएससी समन्वय समितीचे महेश घरबुडे यांनी आरोप केला आहे. त्यामुळे या दिवशीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
मी पोलीस उपनिरीक्षकची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाले आहे. त्यामुळे माझी मुख्य परीक्षा २९ जानेवारी रोजी आहे. मात्र, मला म्हाडाची देखील परीक्षा द्यायची आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने माझी एक संधी हुकणार आहे. परीक्षांच्या तारखा जाहीर करताना यंत्रणेने याचा विचार करायला हवा असे विद्यार्थिनी आदिती भोसले हिने सांगितले.
पोलीस उपनिरीक्षक या पदाची मुख्य परीक्षा २९ जानेवारी रोजी सकाळी आणि दुपारच्या सत्रात होणार आहे.
म्हाडाच्या विविध पदांसाठीच्या परीक्षा पुढीलप्रमाणे
* सहायक/वरिष्ठ लिपिक/कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या पदांची परीक्षा २९ जानेवारी आणि ३० जानेवारी या दोन दिवशी एकूण सहा सत्रात होणार असून सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा सत्रात परीक्षा होणार आहे.
* कार्यकारी अभियंता/उपअभियंता/सहायक अभियंता या पदांची परीक्षा ३१ जानेवारी रोजी सकाळ, दुपार आणि संध्याकाळ या एकूण तीन सत्रात होणार आहे.
* सहायक विधी सल्लागार या पदाची परीक्षा ३१ जानेवारी रोजी संध्याकाळ या एकाच सत्रात होणार आहे.
* कनिष्ठ अभियंता या पदाची परीक्षा १ फेब्रुवारी रोजी सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तीन सत्रात होणार आहे.
* लघुटंकलेखक/भूमापक/अनुरेखक/स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या पदांची परीक्षा २ फेब्रुवारी रोजी सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात होणार आहे.
* मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी या पदांची परीक्षा ३ फेब्रुवारी रोजी सकाळ या एकाच सत्रात होणार आहे.
* कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहायक या पदाची परीक्षा ३ फेब्रुवारी रोजी दुपार या एकाच सत्रात होणार आहे.