‘म्हाडा’ची प्रक्रिया भ्रष्टाचारमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:10 AM2021-01-23T04:10:56+5:302021-01-23T04:10:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्याचे काम सुरु आहे. म्हाडाची प्रक्रिया ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्याचे काम सुरु आहे. म्हाडाची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त असून यासाठी कोणत्याही दलालाची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये,” असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले
‘म्हाडा’च्या योजनेत घर मिळवून देणाऱ्या दलालाविरुध्द संबंधित विभागाचे मंत्री, पोलीस विभाग, म्हाडा कार्यालयाकडे तक्रार करा, असेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. २२) पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ पुणे विभागाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, सोलापूर, कोल्हापूर व सांगलीतल्या विविध योजनांमधील ५ हजार ६४७ सदनिकांची ऑनलाईन सोडत काढण्यात आली. त्यानंतर ते बोलत होते.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार अशोक पवार, उपमहापौर सरस्वती शेंडगे, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर आदी यावेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, “घरांच्या वाढलेल्या किंमतींमुळे घर घेण्याचे नागरिकांचे स्वप्न अपूर्ण राहते. ‘म्हाडा’च्या माध्यमातून माफक किंमतीत घरे उपलब्ध होत आहेत.” म्हाडाच्या पुणे मंडळाचे मुख्याधिकारी नितीन माने यांनी प्रास्ताविक केले. मिळकत उपअभियंता संजय नाईक यांनी आभार मानले.