Pune Mhada lottery: ग्रामीण भागातही म्हाडाची योजना राबवणार; आढळराव पाटलांची माहिती, ६ हजार २९४ घरांची लॉटरी

By नितीन चौधरी | Published: October 10, 2024 04:42 PM2024-10-10T16:42:41+5:302024-10-10T16:43:01+5:30

म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या योजनेतील २ हजार ३४० तसेच १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनांतील १३१ सदनिकांचा समावेश

MHADA scheme will also be implemented in rural areas Information of Adharao Patals, Lottery of 6 thousand 294 houses | Pune Mhada lottery: ग्रामीण भागातही म्हाडाची योजना राबवणार; आढळराव पाटलांची माहिती, ६ हजार २९४ घरांची लॉटरी

Pune Mhada lottery: ग्रामीण भागातही म्हाडाची योजना राबवणार; आढळराव पाटलांची माहिती, ६ हजार २९४ घरांची लॉटरी

पुणे: म्हाडाकडून यापुढे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी गृहनिर्माण योजना राबविण्याचे नियोजन सुरू आहे. या संदर्भात सर्व नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांची बैठक घेऊन कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती पुणेम्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. मंचर, शिरूर, खराबवाडी, आळंदी येथे काही जागा उपलब्ध झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

म्हाडातर्फे दसऱ्याच्या मुहूर्तावर ६ हजार २९४ घरांच्या सोडतीचा प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी म्हाडाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे उपस्थित होते. ते म्हणाले, “पुणे पिंपरी महापालिका तसेच पीएमआरडीए क्षेत्रातही या सोडतीमध्ये मोठ्या प्रमाणावर घरे उपलब्ध झाली आहेत. ग्रामीण भागातूनही अशा पद्धतीची मागणी होत असल्याने मोठ्या नगरपालिका तसेच नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रात मोकळी जागा शोधण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार मंचर व शिरूरमध्ये प्रत्येकी चार एकर, चाकण जवळील खराबवाडी येथे अडीच एकर आळंदी येथे पाच एकर जागा शोधली असून या संदर्भातील प्रस्ताव म्हाडाच्या मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरीतील म्हाडाच्या जुन्या वसाहतींमधील घरे मोडकळीस आली असून या इमारतींच्या पुनर्विकास संदर्भातील प्रस्तावही तयार करण्याचे काम सुरू आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे.

संगणकीय सोडतीमध्ये सामान्यांना येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन त्यात समाधानकारक तोडगा काढण्यात येईल, असेही आढळराव यांनी यावेळी सांगितले. अर्ज भरताना कागदपत्रांच्या पडताळणीची जबाबदारी ॲप चालविणाऱ्या कंपनीकडे देण्यात आली आहे. त्यामुळे पडताळणीमध्ये अनेक अर्ज बाद होत आहेत. याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. म्हाळुंगे येथील म्हाडाच्या वसाहतीतील घरांची विक्री होत नसल्याचे सांगून घरांच्या विक्रीसाठी मार्केटिंग एजन्सीसोबत करार करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वसाहतीला जाण्यासाठी रस्ता नव्हता. मात्र, जिल्हाधिकारी पीएमआरडीए प्रशासनाशी समन्वय साधून भूसंपादनाचे काम सुरू आहे. त्यामुळे येथे लवकरच रस्ता तयार केला जाणार आहे. त्यानंतर येथील घरांची विक्री वाढेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पुणे मंडळामार्फत म्हाडाच्या विविध योजनेतील सदनिका, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर असलेल्या सदनिका व २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या एकूण ६२९४ सदनिकांची संगणकीय सोडतीचा प्रारंभ आजपासून सुरु करण्यात आला आहे. यात २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत पुणे, पिंपरी चिंचवड व पीएमआरडीए क्षेत्रातील तब्बल ३ हजार ३१२, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेंतर्गत ४१८, म्हाडाच्या विविध योजनेतील ९३, म्हाडा पीएमएवाय ४१८, म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या योजनेतील २ हजार ३४० तसेच १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनांतील १३१ सदनिकांचा समावेश आहे.

केवळ ७६ घरांची विक्री

या सोडतीमध्ये म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेतील २ हजार ३४० घरे अजूनही विनाविक्री पडून आहेत. म्हाडाने मार्चमध्ये काढलेल्या सोडतीत ही संख्या २ हजार ४१६ इतकी होती. याचाच अर्थ मार्चच्या सोडतीत केवळ ७६ घरांची विक्री झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही घरे अनेक सोडतींमध्ये विनाविक्री पडून असल्याचे समोर आले आहे. या घरांच्या परिसरातील घरांच्या किमतीच्या तुलनेत म्हाडाच्या घरांच्या किमती अधिक आहेत. सरकारी नियमामुळे किमतीत तडजोड करणे शक्य नाही. खासगी बिल्डरकडील घरांसाठी तडजोड करणे शक्य आहे. त्यामुळे ही घरे खासगी संस्थांना विक्रीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, तरीही या घरांची विक्री झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: MHADA scheme will also be implemented in rural areas Information of Adharao Patals, Lottery of 6 thousand 294 houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.