सर्वसामान्यांच्या निवाऱ्याची काळजी घेणारी ‘म्हाडा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:11 AM2021-02-10T04:11:22+5:302021-02-10T04:11:22+5:30

यापुढे देखील नवीन नियमानुसार खासगी बिल्डरांकडून २० टक्क्यांची घरे उपलब्ध करून घेणे, यासाठी संबंधित महापालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांची ...

MHADA takes care of the common man's shelter | सर्वसामान्यांच्या निवाऱ्याची काळजी घेणारी ‘म्हाडा’

सर्वसामान्यांच्या निवाऱ्याची काळजी घेणारी ‘म्हाडा’

Next

यापुढे देखील नवीन नियमानुसार खासगी बिल्डरांकडून २० टक्क्यांची घरे उपलब्ध करून घेणे, यासाठी संबंधित महापालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेऊन २० टक्के घरे देण्यासाठी पात्र असलेल्या बिल्डरांकडून ती वेळेत उपलब्ध करून घेणे, म्हाडाच्या ताब्यातील जागांचा जास्तीत जास्त चांगला आरखडा तयार करून नवनवीन प्रकल्पांची उभारणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे म्हाडाच्या सोसायट्यांच्या रि-डेव्हलपमेंटचा विषय प्राधान्याने मार्गी लावणे यासाठी म्हाडा पुण्याचे मुख्याधिकारी नितीन माने-पाटील आणि त्यांची संपूर्ण यंत्रणा झपाटून काम करत आहे. सर्वसामान्यांचे गृहस्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा कटिबद्ध असल्याचे नुकत्याच काढण्यात आलेल्या साडेपाच हजार घरांच्या लाॅटरीवरून म्हाडा प्रशासनाने दाखवून दिले आहे.

-----------

पदभार स्वीकारला आणि तीन महिन्यांतच काढली साडेपाच हजार घरांची बंपर सोडत

म्हाडाच्या पुणे विभागाच्या मुख्याधिकारीपदी सप्टेंबर २०२० मध्ये नितीन माने-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. माने यांनी म्हाडाचा पदभार स्वीकारला तेव्हा पुणे विभागात कोरोनाचा कहर सुरू होता. नोकरी, धंदा गेल्याने नागरिक हैराण झाले होते. या परिस्थितीचा अंदाज घेऊन नितीन माने-पाटील यांनी स्वत: व म्हाडाच्या कार्यालयातील सर्व संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र काम करून पुणे म्हाडाच्या इतिहासातील सर्वात मोठी म्हणजे तब्बल ५ हजार ६४७ घरांची बंपर सोडत जाहीर केली. कोरोनामुळे पिचलेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी ऐन दिवाळीत म्हणजे ऑक्टोबर महिन्यांतच ही सोडत काढण्याचे नियोजन माने यांनी केले होते.

परंतु याचदरम्यान माने यांना कोरोनाची लागण झाली. कामाच्या व्यापात थोडे दुर्लक्ष झाल्याने त्यांना पंधरा-वीस दिवस हाॅस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागले. कोरोनातून बरे झाल्यानंतर थोडीदेखील विश्रांती न घेता त्वरित कामावर हजर झाले. परंतु याच कालावधीत शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. यामुळे ऑक्टोबर महिन्यांत निघणारी सोडत आचारसंहिता संपुष्टात येताच डिसेंबर महिन्यात काढण्यात आली. कोरोनावर मात करत माने यांनी अत्यंत कमी वेळेत आणि तीही थेट साडेपाच हजार घरांची सोडत जाहीर करून नवीन विक्रम केला.

---------

नामांकित बिल्डरांकडील घरे मिळाली

शासनाने कायदा करून शहरी भागात व ज्या महापालिकेची लोकसंख्या १० लाखांपेक्षा अधिक आहे अशा ठिकाणी एक एकरपेक्षा अधिक जागेत एखाद्या बिल्डरांकडून प्रकल्प उभारण्यात आला तर त्यातील २० टक्के घरे म्हाडाला शासकीय बांधकाम दरात उपलब्ध करून देणे बंधनकारक केले. तर पीएमआरडीए व अन्य नगरपालिका हद्दीत ही मर्यादा अडीच एकरपेक्षा अधिक जागेत प्रकल्प उभारल्यास २० टक्के घरे म्हाडा देणे बंधनकारक केले. गेल्या काही वर्षांत म्हाडासोबतच शहर, पिंपरी-चिंचवड आणि चाकण, तळेगांव सारख्या मोठ्या नगरपालिका क्षेत्रातल्या नामांकित बिल्डरांकडच्या सदनिका बाजारभावापेक्षा सुमारे ३० ते ५० टक्के कमी किंमतीत उपलब्ध होऊ लागल्या आहेत. पुणे म्हाडाने आजवर नामांकित बिल्डरांकडील सहा हजारांपेक्षा जास्त सदनिका सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. भविष्यात जास्तीत जास्त लोकांना या २० टक्क्यातील घरे उपलब्ध करून देण्यासाठी पुणे म्हाडाचे मुख्य अधिकारी नितिन माने-पाटील प्रयत्नशील आहेत. यासाठी त्यांनी जोरदार मोहीम हाती घेतली आहे.

---------

पुणे म्हाडामुळे आत्तापर्यंत ४१ हजार ९९७ लोकांची स्वप्नपूर्ती

पुणे, पिंपरी-चिंचवड सारख्या शहरात आपले हक्काचे, स्वत:चे घर असावे असे प्रत्येकालाच वाटते. गेल्या काही वर्षांत घरांच्या वाढलेल्या प्रचंड किंमतीमुळे स्वत:च्या घराचे स्वप्न स्वप्नच राहिले आहे. सर्वसामान्य व गरीब लोकांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाने पुढाकार घेतला. पुणे मंडळांतर्गत बैठ्या घरांपासुन ते २२ मजल्यांच्या इमारतींचे कामे यशस्‍वीपणे पूर्ण केली. पुणे म्हाडाने विविध ठिकाणी आजतागायत वेगवेगळ्या गटाअंतर्गत एकूण २४३ योजना विकसित केल्या असून, आतापर्यंत ३२ हजार २३५ सदनिका आणि ८ हजार ४६७ भूखंड अशा एकूण ४१ हजार ९९७ सदनिका व भूखंडांचे काम पूर्ण केले आहे.

याशिवाय पुणे मंडळामार्फत सद्यस्थितीत विविध उत्पन्न गटाअंतर्गत ३ हजार ११३ सदनिका व भूखंडाचे काम हाती घेण्यात आले आहे. ही कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. मंडळामार्फत नजिकच्या कालावधीत विविध उत्पन्न गटाअंतर्गत १ हजार ५३२ सदनिका आणि ३२ भूखंडांचे काम प्रस्तावित आहे. अत्यल्प उत्पन्न गटांतर्गत प्रधानमंत्री आवास योजने (घटक ३)त विविध ठिकाणी एकूण १ हजार ६२० सदनिकांचे काम प्रगतीपथावर असून ७२० सदनिकांचे काम प्रस्तावित आहे. मौजे म्हाळुंगे (ता. चाकण) येथे ६४८ सदनिकाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

--------

सहा तासात लाॅटरीचे एसएमएस आणि पंधरा दिवसांत पीओ लेटर : पुणे म्हाडाची नवी क्रांती

म्हाडाचा कारभार म्हणजे प्रचंड वेळखाऊपणा असा समज आहे. कागदपत्रे पूर्ण करून पीओ लेटर मिळणे आणि त्यानंतर प्रत्यक्ष घर मिळणे यासाठी तर महिनोमहिने हेलपाटे आणि मनस्ताप अशी म्हाडाबद्दलची प्रतिमा लोकांमध्ये तयार झाली आहे. मात्र या प्रतिमेला छेद देण्याचे काम पुणे म्हाडाने केले आहे. तेही कोरोना काळात.

डिसेंबर २०२० मध्ये साडेपाच हजारांपेक्षा अधिक घरांची बंपर सोडत काढली. यासाठी लाखो लोकांनी अर्ज केले होते. या सोडतीत ज्या लोकांना लाॅटरी लागली त्यांना सोडत निघाल्यानंतर पुढच्या सहा तासाच्या आत एसएमएस व ईमेल द्वारे लाॅटरी लागल्याचे आणि अभिनंदनाचे एसएमएस पाठविण्यात आले होते. ही तत्परता पाहून नागरिकांना किती सुखद धक्का बसला याचे वर्णन करणे अवघड आहे. याच सोबत पुढील सदनिकेची दहा टक्के रक्कम भरून पीओ लेटर घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे द्यायची आणि त्यासाठी कधी उपस्थित राहायचे हे देखील ईमेलद्वारे कळविण्यात आले. कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी म्हाडा कार्यालयात खास शिबिर घेऊन लोकांना पंधार ते वीस मिनिटात पीओ लेटर हातात देऊन तर म्हाडा कार्यालयाने लोकांची मनेच जिंकली. एरवी हीच प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सात-आठ महिन्यांचा कालावधी लागत असे.

----------

लोकांचा दृष्टिकोन बदलतोय

म्हाडाचे घर म्हणजे अमूक एकाच रंगाची इमारत, देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष अशीही प्रतिमा दुर्दैवाने तयार झाली आहे. नामांकित व खाजगी बिल्डरांच्या स्कीममध्ये घर मिळणे, चांगल्या परिसरात घर मिळणे आणि तेही बाजारभावापेक्षा ३०-४० टक्के कमी दराने, ही बाब काही वर्षांपुर्वीपर्यंत अशक्यप्राय मानली जात होती. अलिकडच्या काळात मात्र अशी घरे मिळू लागल्याने म्हाडाच्या घरांबाबतचा लोकांचा दृष्टिकोन बदलतो आहे. एवढेच नव्हे तर म्हाडाने स्वत:च्या जागेत प्रकल्प उभारताना देखील याची काळजी घेतली आहे. खासगी बिल्डरांनाही हेवा वाटावा अशा सर्व सोयी-सुविधायुक्त व तेवढ्याच दर्जेदार प्रकल्पांची उभारणी केली आहे.

हे करताना म्हाडाच्या पॅनेलवरील अनेक नामांकित आर्किटेक्चर यांची मदत घेण्यात येते. याशिवाय म्हाडाकडून पुरविण्यात येणाऱ्या सुविधामध्ये जलद गती आली आहे. यामुळेच लोक सध्या म्हाडाच्या घरांची लाॅटरी कधी लागणार याची वाट पाहात असतात.

---------

रि-डेव्हलपमेंटसाठी सोसायट्यांच्या पुढाकाराची गरज

महाराष्ट्र हाऊसिंग मंडळाची स्थापन १९७५ मध्ये झाली आणि त्यानंतर १९७७ मध्ये पुणे म्हाडा अस्तित्वात आले. पुण्यात म्हाडाची स्थापना झाली तेव्हा घरांना खूप मागणी नव्हती. तरी देखील म्हाडाच्यावतीने भविष्याचा अंदाज घेऊन पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह विभागातील अन्य जिल्ह्यात शासनाकडून नाममात्र दरात जमीन खरेदी करून ठेवल्या. पुण्यातला येरवडा परिसर बव्हंशी म्हडाने विकसित केला आहे. याशिवाय पुण्यातील लोकमान्यनगर, आगरकरनगर, गोखलेनगर, कोथरूड, लक्ष्मीनगर, स्वामी विवेकानंदनगर आदी परिसरात देखील मोठ्या प्रमाणात म्हाडाच्या सोसायट्या, बैठी घरे उभी राहिली आहेत. यातील अनेक सोसायट्या, घरांचे आयुष्य संपत आल्याने यातल्या अनेक इमारतींच्या पुनर्विकासाची आता खऱ्या अर्थाने गरज आहे. मात्र यासाठी सोसायट्यांनी पुढे येण्याची गरज आहे.

पुनर्विकासाच्या नियमावलीत शासनाने अनेक बदल केले असून काम सोपे केले आहे. यात पूर्वी ७१ टक्के घरमालकांचे संमतीपत्र आवश्यक होते. नवीन नियमानुसार केवळ ५१ टक्केच लोकांची संमती आवश्यक आहे. तसेच वाढीव एफएसएआय देखील दिला आहे. यामुळे जास्तीत जास्त सोसायट्यांनी पुनर्विकासासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितिन माने-पाटील यांनी केले आहे.

----------

‘हार्ट ऑफ सिटी’त राहण्यासाठी पुनर्विकास आवश्यक

पुणे शहरातील लोकमान्यनगर, अगरकरनगर, गोखलेनगर, कोथरूड, लक्ष्मीनगर, स्वामी विवेकानंदनगर आदी परिसरात म्हाडाच्या सोसायट्यांची संख्या मोठी आहे. परंतु ही बहुतेक घरे तीन मजली इमारती अथवा बैठी घरे आहेत. त्यावेळी शासनाने दिलेला एफएसएआय देखील वापरलेला नाही. त्यात आता वाढीव एफएसएआय यामुळे जास्तीत जास्त लोकांना पुण्याच्या ‘हार्ट ऑफ सिटी’त राहण्यासाठी या सोसायट्यांच्या पुनर्विकासाशिवा दुसरा पर्याय नाही. यासाठी सोसायट्या पुढे आल्या तर म्हाडा पुढाकार घेणार आहे.

---------

पाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा नवीन घरांची सोडत

पुणे म्हाडाच्या मुख्य अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर नितिन माने -पाटील झपाटून काम करत असून संपूर्ण यंत्रणेला कामाला लावले आहे. साडेपाच हजार घरांची सोडत काढून पंधरा दिवसही झाले नाहीत. तोवर पाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा हजारो घरांची लाॅटरी काढण्याची तयारी सुरू केली आहे. म्हाडा स्वत:च्या घरासाठी तर मार्च महिन्यातच लाॅटरी काढणार आहेत.

Web Title: MHADA takes care of the common man's shelter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.