सामान्यांसाठी आनंदाची बातमी! म्हाडा पुढील वर्षी देणार एक लाख घरे; गृहनिर्माणमंत्री अतुल सावेंची माहिती
By नितीन चौधरी | Published: December 5, 2023 04:45 PM2023-12-05T16:45:25+5:302023-12-05T16:45:49+5:30
म्हाडाच्या वतीने सुमारे नऊ लाख परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्यात आली आहे
पुणे: येत्या वर्षभरात विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत म्हाडातर्फे सुमारे एक लाख घरे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केली. सामान्य नागरिकांना स्वतःचे घर उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाच्यापुणे विभागातर्फे आयोजित सोडतीत उपलब्ध सदनिकांच्या तुलनेत सुमारे दहापटीने अर्ज प्राप्त झाले, असेही ते म्हणाले.
म्हाडाच्या पुणे मंडळाच्यावतीने जिल्हा परिषद येथे सदनिका संगणकीय सोडत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील उपस्थित होते.
सावे म्हणाले, “नागरिकांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार मिळून प्रधानमंत्री आवास योजनांसारख्या विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध करुन दिली जात आहेत. पुणे म्हाडाच्या आजच्या सोडतीत उपलब्ध सदनिकांच्या तुलनेत सुमारे दहापटीने अर्ज प्राप्त झाले. म्हाडाच्या वतीने आतापर्यंत नागरिकांना पाच लाख लाख १४ हजार घरे उपलब्ध केली आहेत. म्हाडाची सोडत प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून अतिशय पारदर्शक आहे, नागरिकांनी चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये.”
मुंबईतील सुमारे ७५ हजार गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे. आगामी काळातही विविध उत्पन्न गटातील नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यापुढे घरांची सोडत वर्षातून दोन वेळेस घेण्यासाठी म्हाडानी प्रयत्न करावेत. पुणे विभागात विविध गृहनिर्माण योजनेकरीता सरकारी भूखंड उपलब्ध करुन देण्याच्या प्रस्तावाला विभागीय आयुक्तांनी गती देण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना सावे यांनी दिल्या.
जयस्वाल म्हणाले, “म्हाडाच्या वतीने सुमारे नऊ लाख परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्यात आली आहे. पुणे म्हाडाच्या वतीने विविध उत्पन्न गटातील सुमारे ३५ हजार सदनिका, सात हजार ८०० भूखंड आणि ७५५ गाळे वितरीत करण्यात आले आहे. सद्यस्थितीत विविध योजनेअंतर्गत तीन हजार ७४० सदनिकांची निर्मिती प्रगतीपथावर आहे. तर ५९२ भूखंड वितरीत करण्यात आले आहे. जुन्या इमारतींचा पुर्नविकास करण्याला गती देण्यात येत आहे.” यावेळी सावे यांच्या हस्ते विजेत्यांना निकालपत्रे देण्यात आली.