म्हाळगी प्रबोधिनीतले ‘बौद्धिक’ गेले वाया, भाजपात २७ दांडीबहाद्दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:33 AM2021-02-20T04:33:29+5:302021-02-20T04:33:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे काही दिवसांपूर्वीच झालेल्या प्रशिक्षणवर्ग घेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे काही दिवसांपूर्वीच झालेल्या प्रशिक्षणवर्ग घेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अनेक ज्येष्ठांनी भाजपाच्या नगरसेवकांचे आदर्श कामकाजाबाबतचे ‘बौद्धिक’ घेतले होते. मात्र या दोन दिवसांच्या प्रशिक्षणाचा परिणाम नगरसेवकांवर झाला नसल्याचे दिसून आले. अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या मिळकतकर वाढीच्या प्रस्तावावरील मतदानाच्यावेळीच भाजपच्या अनेक नगरसेवकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.
पुणे महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भाजप नगरसेवकांचे संख्याबळ शंभरीपर्यंत आहे. पण यातील मोजकेच नगरसेवक महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बोलतात. महापालिकेच्या कामकाजात नियमित भाग घेणाऱ्यांची संख्याही मर्यादित आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने स्वपक्षीय नगरसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर घेतले. “महापालिकेच्या कामकाजात सहभाग वाढवावा आणि पक्षाची प्रतिमा जनमानसात आणखी उंचवावी,” असा हेतू यामागे होता. मात्र हा धडा तब्बल २७ नगरसेवकांनी घेतला नसल्याचे स्पष्ट झाले.
प्रशिक्षण शिबिर होऊन वीस दिवसही होत नाहीत तोवरच शिकवणीत भाजपचे २७ नगरसेवक नापास झाले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी महापालिका सभागृहात हजर राहत नागरिकांच्या हितासाठी कसे प्रश्न उपस्थित करायचे, शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेला अर्थसंकल्प कसा अभ्यासावा या अनुषंगाने राज्याच्या माजी अर्थमंत्र्यांनीही या नगरसेवकांचा तास घेतला. पण अर्थसंकल्पात महत्त्वपूर्ण घटक असलेल्या मिळकतकर वाढीच्या प्रस्तावावरील मतदानाच्या वेळीच अनेक भाजप नगरसेवकांनी दांडी मारली.
महापालिका आयुक्तांचा मिळकतकरवाढीचा प्रस्ताव फेटाळून लावताना, ऑनलाईन सर्वसाधारण सभेत सत्ताधारी पक्षाला गणसंख्येची आवश्यकता होती. सर्वाधिक नगरसेवक असलेल्या भाजप नगरसेवकांची सभेच्या सुरूवातीला ऑनलाईन उपस्थिती नगण्य होती. ऑनलाईन सभेच्या नियमानुसार क्षेत्रीय कार्यालयनिहाय नगरसेवकांनी तेथील कार्यालयात ऑनलाईन सभेस उपस्थित राहणे अपेक्षित होते. पण मिळकतकराच्या प्रस्तावावरील खास सभेत पंधरापैकी कुठल्याच क्षेत्रीय कार्यालयात नगरसेवक आढळले नाहीत.
परिणामी मिळकतकराचा विषय पुकारण्यापूर्वी सभेच्या कामकाजात प्रस्तावाला उपसूचना देण्याची कार्यवाही गटनेत्यांमध्ये चालू असल्याचे कारण देत वेळ काढण्यात आला. यादरम्यान प्रत्येक अनुपस्थित नगरसेवकांना फोन करून सभेला उपस्थित राहण्याची सूचना देण्याची पाळी भाजपावर आली. तरीदेखील २७ नगरसेवकांनी या सभेकडे पाठ फिरवली. यामुळे प्रशिक्षण शिबिराची भाजपा नगरसवेकांना टोचलेली ‘लस’ वाया गेल्याचे दिसून आले.
----------------------------------------