MHT CET 2024: एमएचटी सीईटी निकाल जाहीर, ३७ विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल गुण प्राप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 08:54 AM2024-06-17T08:54:38+5:302024-06-17T08:55:22+5:30
पुणे जिल्ह्यातील साेहम भीमराव लगड पीसीबी ग्रुप, आदित्य अजित करपे पीसीबी आणि अमलेश उमाकांत घाटे पीसीएम या तिघांचा समावेश आहे...
MHT CET result 2024| पुणे : राज्य सामाईक परीक्षा कक्ष (सीईटी सेल) तर्फे घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी पीसीएम- पीसीबी ग्रुप निकाल रविवारी सायंकाळी जाहीर झाला. यंदा पीसीएम आणि पीसीबी ग्रुपमध्ये ३७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजेच १०० पर्सेंटाइल मिळाले आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील साेहम भीमराव लगड पीसीबी ग्रुप, आदित्य अजित करपे पीसीबी आणि अमलेश उमाकांत घाटे पीसीएम या तिघांचा समावेश आहे.
एनटी बी प्रवर्गातून पुण्याचा देवेश रवींद्र माेरे पीसीएम ग्रुपमधून ९९.९०८१८०३ पर्सेंटाईल गुण घेत दुसरा तर एनटी- सी प्रवर्गातील पीसीबी ग्रुपमधून ओम महादेव गाेचडे याने ९९.९९५३५४९ पर्सेंटाइल गुण घेतले आहेत. राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी आदी पदवी अभ्यासक्रम महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी सीईटी सेलतर्फे यंदा २२ एप्रिल ते १६ मे या कालावधीत एमएचटी सीईटी- २०२४ परीक्षेचे आयाेजन केले हाेते.
पीसीबी ग्रुप २२ ते ३० एप्रिल आणि पीसीएम ग्रुप २ ते १६ मे या कालावधीत एकूण १५९ केंद्रांवर परीक्षा पार पडल्या. त्यामध्ये राज्याबाहेरील १६ केंद्रांचाही समावेश हाेता. यंदा पीसीएम ग्रुपसाठी ३ लाख १४ हजार ६७५ आणि पीसीबी ग्रुपसाठी ४ लाख १० हजार ३७७ उमेदवारांनी नाेंदणी केली हाेती. त्यापैकी अनुक्रमे २ लाख ९५ हजार ५७७ आणि ३ लाख ७९ हजार ८००, अशा एकूण ६ लाख ७५ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी एमएचटी सीईटी परीक्षा दिली हाेती.