MHT-CET उमेदवारांना पुन्हा उत्तरे तपासता येणार; प्रश्नपत्रिकेसह सुधारित उत्तरतालिका प्रसिद्ध
By प्रशांत बिडवे | Published: June 27, 2024 04:06 PM2024-06-27T16:06:03+5:302024-06-27T16:06:32+5:30
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी एमएचटी-सीईटी २०२४ ही सामाईक प्रवेश परीक्षा ऑनलाईन पध्दतीने विविध सत्रात घेण्यात आली....
पुणे : एमएचटी-सीईटी २०२४ परीक्षा दिलेल्या असंख्य उमेदवारांनी सीईटी सेलने निकाल जाहीर करण्यापूर्वी दिलेल्या कालावधीत प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका तपासून पाहिल्या नसल्याचे निर्दशनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलतर्फे प्रश्नपत्रिका आणि प्रश्ननिहाय उत्तर सुधारित उत्तरतालिका उमेदवारांच्या लाॅगीनमध्ये दाेन दिवसांसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार उमेदवारांना पुन्हा उत्तरे तपासता येणार आहेत.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी एमएचटी-सीईटी २०२४ ही सामाईक प्रवेश परीक्षा ऑनलाईन पध्दतीने विविध सत्रात घेण्यात आली. या परीक्षेनंतर उमेदवारांना त्यांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन पध्दतीने आक्षेप नोंदणी सुविधा पीसीबी ग्रुप साठी दि. २२ ते २४ मे आणि पीसीएम ग्रुप साठी दि. २४ ते २६ मे या कालावधीत उपलब्ध करुन दिली होती. प्राप्त झालेल्या आक्षेपांचे विषय तज्ज्ञांकडून निराकरण करण्यात आले. तसेच याबाबतचा अहवाल या कार्यालयाच्या संकेतस्थळावर दि.७ जून रोजी उमेदवार / पालक / संस्था यांच्या माहितीकरीता प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर सीईटी सेलने याेग्य त्या सुधारणा करुन सुधारीत उत्तरतालिकेनुसार निकाल तयार करुन त्याची विशेष तज्ज्ञांकडून पडताळणी करुन दि. १६ जून रोजी प्रसिध्द केलेला आहे.
सीईटी सेल कार्यालयास भेट दिलेले उमेदवार आणि पालक यांच्याशी चर्चा केल्यानंतर काहींनी नमूद कालावधीत प्रश्नपत्रिका, उत्तरतालिका यांचे अवलोकन केले नाही. त्यांच्या समाधानासाठी पुन्हा एकदा प्रश्नपत्रिका, उमेदवारांनी प्रश्ननिहाय दिलेले उत्तर आणि सुधारीत उत्तर तालिकेनुसार अचुक उत्तर उमेदवारांच्या लॉगीनमध्ये पीसीएम, पीसीबी प्रत्येकी दाेन दिवस कालावधीसाठी पाहण्याकरीता सुविधा उपलब्ध करुन देण्यात आहे असे सीईटी सेलतर्फे स्पष्ट करण्यात आले.
एमएचटी सीईटी २०२४
पीसीएम ग्रुप : दि. २७ ते २८ जून
पीसीबी ग्रुप : दि. २९ ते ३० जून