MHT-CET | सीईटी पुढे ढकलल्याने पालकांच्या खिशाला कात्री; आणखी दोन महिने क्लास सुरू राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 04:13 PM2022-04-25T16:13:39+5:302022-04-25T16:16:46+5:30
विद्यार्थी व पालकांच्या खिशाला कात्री लागणार...
पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेच्या तारखेत काही बदल करण्यात आला आहे. परिणामी आणखी दोन महिने खासगी क्लास सुरू राहणार आहेत. मात्र, त्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
सीईटी सेलतर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आदी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी येत्या जून महिन्यात सीईटी परीक्षा घेतली जाणार होती. विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेनंतर सीईटी परीक्षेची तयारी सुरू केली. मात्र, नीट व जेईई परीक्षा याच कालावधीत होणार असल्याने राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सीईटी परीक्षा ऑगस्ट महिन्यात घेणार असल्याचे जाहीर केले.
परिणामी, विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळाला. परंतु त्यामुळे काही खासगी क्लास चालकांनी दोन महिन्यांसाठी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क घेण्याबाबत चर्चा सुरू केली आहे. सर्वसाधारणपणे 'सीईटी क्रॅश कोर्स साठी १५ हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. बहुतांश क्लास चालक १५ हजार ते २० हजार रुपयांमध्येसुद्धा विद्यार्थ्यांना सीईटीचे मार्गदर्शन करतात. जून
महिन्यात सीईटी परीक्षा होणार असल्याने क्लास चालकांनी त्यानुसार शुल्क निश्चित केले होते. मात्र, दोन महिने अधिकचे शिकवावे लागणार असल्याने क्लास चालकांकडून शुल्क वाढवले जात आहे. दोन महिने परीक्षा पुढे गेल्याने काही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीला अवधी मिळणार आहे. परिणामी चांगले गुण मिळवून विद्यार्थी नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकतील. परंतु, चार ते पाच महिने अभ्यासाला असल्याने काहींना कंटाळा येऊ शकतो. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालावर होण्याची नाकारता शक्यता येत नाही.
अभ्यासावर परिणाम
शासनाकडून वेळोवेळी सीईटी परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्याच्या अभ्यासाच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. सर्वच क्लास चालक अशा वेळी विद्यार्थ्यांना मोफत शिकवत नाहीत त्यामुळे विनाकारण विद्यार्थ्यांना शिकवणीसाठी अधिकची रक्कम मोजावी लागते.
- हरिश बुटले, प्रवेशपूर्व परीक्षांचे अभ्यासक