एमएचटी सीईटीचा निकाल १२ जूनला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2023 08:30 AM2023-05-25T08:30:32+5:302023-05-25T08:30:45+5:30
जूनच्या पहिल्या आठवड्यात कॅप प्रवेश फेऱ्यांना सुरुवात होणार आहे, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
पुणे : इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर आणि फार्मसीच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल १२ जूनच्या आसपास जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात कॅप प्रवेश फेऱ्यांना सुरुवात होणार आहे, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली.
या परीक्षेसाठी यंदा ६ लाख ३६ हजार ८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पीसीएम ग्रुपसाठी ३ लाख ३३ हजार ४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी तीन लाख १३ हजार ७३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर १९ हजार ३०२ विद्यार्थी अनुपस्थित होते.
पीसीबी ग्रुपसाठी ३ लाख ३ हजार ४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन लाख ७७ हजार ४०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर २५ हजार ६४५ विद्यार्थी अनुपस्थित होते. पीसीएम ग्रुपचे १९ हजार ३०९, तर पीसीबी ग्रुपचे २५ हजार ६४५ अशा एकूण ४४ हजार ९५४ विद्यार्थ्यांनी एमएचटी सीईटीला दांडी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रक्रियेची सुरुवात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.