बिबट्याचा मेंढपाळावर मध्यरात्री हल्ला; पुणे जिल्ह्यातील पारगाव तर्फे आळे येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 05:49 PM2017-12-06T17:49:43+5:302017-12-06T17:55:46+5:30
बुधवारी पहाटेच्या सुमारास पारगाव तर्फे आळे येथे बिबट्याने एका मेंढपाळावर हल्ला करून त्याला जखमी केले आहे. आप्पा टकले यांना अधिक उपचारासाठी पुणे येथील वाय. सी. एम. रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांना २५ टाके पडले आहेत.
बेल्हा : जुन्नर तालुक्यात आता बिबट्याचा हल्ला झाला नाही, असा दिवस उजाडत नाही. बुधवारी पहाटेच्या सुमारास पारगाव तर्फे आळे येथे बिबट्याने एका मेंढपाळावर हल्ला करून त्याला जखमी केले आहे.
याबाबतची माहिती अशी : मेंढपाळ आप्पा केरू टकले (सध्या रा. पारगाव तर्फे आळे) यांनी त्यांची बकरी बाळू उंडे यांच्या कोबीच्या शेतात बसविली होती. त्यांचे कुटुंबीयही शेजारीच असलेल्या त्यांच्या खोपीत झोपले होते, तर आप्पा टकले बकऱ्यांच्या वाड्यात (कळप) झोपले होते. वाड्याच्या जवळच बिबट्याही दबा धरून बसला होता. रात्री १ वाजण्याच्या समारास मेंढ्यांचा ओरडण्याचा व बुजण्याचा आवाज आल्याने आप्पा उठून बसले. ते उभे राहतानाच अचानकपणे बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे ते एकदमच घाबरून गेले. बिबट्याने त्यांच्या कान, तोंड व उजव्या बाजूला दाढीकडील भागाला जखमा केल्या.
पांडुरंग डुकरे यांनी वनखात्याला माहिती दिली. त्यांना येथून जवळच असलेल्या प्राथमिक उपचारासाठी आंबेगाव तालुक्यातील पारगाव (शिंगवे) येथील खासगी रुग्णालयात वन अधिकाऱ्यांच्या मदतीने दाखल केले. तेथे उपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी पुणे येथील वाय. सी. एम. रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांना २५ टाके पडले आहेत.
या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या ठिकाणी वनकर्मचारी दत्तात्रय फापाळे, के. एस. नायकोडी व आनंदा गुंजाळ यांनी पाहणी केली. या ठिकाणी लगेचच पिंजरा लावणार असल्याचे फापाळे यांनी सांगितले. या परिसरात ग्रामस्थांना बिबट्या दिवसा व कधी रात्रीच्या वेळी दिसत होता. तसेच पाळीव जनावरांवरही हल्ले करीत होता. लहान मुलेही रस्त्याने जाताना घाबरत होती.