‘मसाप’ कार्यकारिणीची मध्यावधी निवडणूक अशक्य; ठराव मंजूर करून कार्यकारिणीला मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 02:04 PM2023-07-08T14:04:54+5:302023-07-08T14:05:40+5:30
आजीव सभासद देणे बंद केले आहे का?...
पुणे : ‘सध्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीवर आरोप झाले आहेत. पण त्याला काही अर्थ नाही. आताची जी कार्यकारिणी आहे तिची मुदत २०२१ मध्ये संपली. त्यानंतर कोरोनामुळे त्या कार्यकारिणीला मुदतवाढ दिली. तेव्हा घटनेनुसार टर्म पूर्ण करणे आवश्यक असते. सर्वानुमते ठराव झाला आहे की, कार्यकारिणी ही टर्म पूर्ण करेल. त्यामुळे आता निवडणूका घ्या, म्हणण्याला अर्थ नाही. घटनेनुसार मध्यावधी निवडणुका घेता येणार नाहीत, असे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष रावसाहेब कसबे यांनी सांगितले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक २०२१ साली होणे अपेक्षित होते. परंतु कोरोनाजन्य परिस्थितीचा आधार घेत त्यावेळच्या कार्यकारिणीने वार्षिक सर्वसाधारण बैठक बोलावली. त्या बैठकीत प्रा. मिलिंद जोशी यांच्या २०१६ ते २०२१ या कालावधीत पदावर असलेल्या कार्यकारिणीने कोरोनाचे सावट असल्यामुळे निवडणुका घेणे शक्य होणार नाही, असे सांगितले. कोरोनाकाळात परिषदेचे कामकाज ठप्प झाल्यामुळे आमचा कालावधी वाया गेला. त्यामुळेच आमच्या कार्यकारिणीला पाच वर्षांची मुदतवाढ द्यावी असा ठराव तेव्हा मांडला गेला. घटनेनुसार तो ठराव मंजूर झाल्याचे कसबे यांनी सांगितले आहे. परंतु, मसापचे आजीव सदस्य विजय शेंडगे यांच्यानुसार हे घटनाबाह्य असून, निवडणुका घेतल्या जात नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे.
आजीव सभासद देणे बंद केले आहे का?
यावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले,‘मसापमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये चांगले बदल झाले आहेत. माधवराव सभागृहाचे नूतनीकरण झाले. सर्व गोष्टी चांगल्या होत असताना काहीजण केवळ स्वार्थासाठी आरोप करत आहेत. आम्ही आजीव सभासद करणे थांबविलेले नाही. त्यासाठी कार्यकारिणी निर्णय घेईल. कारण आजीव सभासद लगेच देता येत नाही.’