चिखलीत नवदाम्पत्याची आत्महत्या
By admin | Published: February 21, 2017 02:33 AM2017-02-21T02:33:47+5:302017-02-21T02:33:47+5:30
उच्चशिक्षित नवदाम्पत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार रविवारी
पिंपरी : उच्चशिक्षित नवदाम्पत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार रविवारी सायंकाळी चिखली, मोरेवस्ती भागात उघडकीस आला. आत्महत्येमागील नेमके कारण अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत विलास ढमाले (वय २५), अश्विनी अनिकेत ढमाले (वय २२) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. अनिकेत हा मेकॅनिकल इंजिनिअर, तर अश्विनी फॅशन डिझायनर होती. त्यांचे १३ महिन्यांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी,असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
अनिकेत हा चिखली, मोरेवस्ती येथील साने चौकाजवळ सुदर्शननगरमध्ये आई, वडील आणि भावाबरोबर राहत होता. आई-वडील एका लग्न समारंभासाठी, तर भाऊ बाहेर गेलेला असताना दोघांनी आत्महत्या केली.
अनिकेतचा भाऊ घरी आल्यावर त्याने दार वाजवले.
बराच वेळ प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला. त्या वेळी हॉलमधील पंख्याच्या हुकाला साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अनिकेतचा मृतदेह आढळला. तर बेडरूममध्ये याच पद्धतीने गळफास घेतलेला अश्विनीचा मृतदेह आढळून आला.
(प्रतिनिधी)