पुण्यातील अरुंद रस्त्यांवर आता धावणार मिडी बसेस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 08:29 PM2020-02-21T20:29:38+5:302020-02-21T20:30:27+5:30
दाड वस्तीच्या अरुंद रस्त्यावर आता पीएमपीकडून मिडी बसेस साेडण्यात येणार असून त्यामुळे वाहतूक काेंडीतून नागरिकांची सुटका हाेणार आहे.
पुणे : शहरातील दाट लोकवस्तीतील अरूंद रस्त्यांवर मिडी बस सोडण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार प्रशासनाने ४५ मार्ग निश्चित केले आहेत. या मार्गांवर प्राधान्याने मिडी बस सोडण्याच्या सुचना आगार प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी काही दिवसांपुर्वी पेठांमधील अरूंद रस्त्यांवरून मिडी बस सोडण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पीएमपी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी याबाबत तातडीने निर्णय घेत पेठांमधील रस्त्यांवरून मिडी बसला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
पीएमपीच्या ताफ्यात सध्या २०० मिडी बस आहेत. मात्र यापैकी अनेक बस सासवडसह अन्य लांबपल्ल्याच्या मार्गांवर सोडण्यात येत आहेत. या बसचे मार्ग मुख्य रस्त्यांवरून जातात. मिडी बस ताफ्यात येण्यापुर्वी अरूंद रस्त्यांवरून सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. पण प्रत्यक्षात त्याबाबत कसलेही नियोजन करण्यात आले नाही. बारा मीटर लांबीच्या बस अरूंद रस्त्यांवरून धावत असल्याने अनेकदा वाहतुक कोंडी होती. रस्त्यांवर इतर वाहने योग्य पध्दतीने पार्किंग न केल्याने या बसला अडथळे निर्माण होतात. यापार्श्वभुमीवर अरूंद रस्त्यांवरून मिडी बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार पीएमपी प्रशासनाने ४५ मार्ग निश्चित केले आहेत. त्यासाठी सुमारे १३० बसचे नियोजन केले असून या बसच्या सुमारे १७५० फेऱ्या नियोजित आहेत. या मार्गांमध्ये प्रामुख्याने स्वारगेट-कोंढवा गेट, वडगाव बु.-महात्मा फुले मंडई, शनिपार-निलज्योती सोसायटी, शनिपार-गोखलेनगर, हडपसर-कोथरुड डेपो, धनकवडी-पुणे स्टेशन, वारजे नाका/गालिंदे पथ-पुणे स्टेशन, खंडोबा मंदीर-शिवाजीनगर, हडपसर-वारजे माळवाडी, कोथरुड डेपो-पुणे स्टेशन आदी मार्गांचा समावेश आहे. याबाबतचे नियोजन सर्व आगारांना देण्यात आले आहे. त्यानुसार मिडी बस मार्गावर सोडण्याच्या सुचना आगार प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.