परप्रांतीय महिलेला ९ दिवस खोलीत डांबून लैंगिक अत्याचार; नराधमाला ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 16:07 IST2025-01-14T16:06:34+5:302025-01-14T16:07:02+5:30
तुझ्यावर पहारेकरी नेमले असून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर फिक्स खून करेन अशी धमकी आरोपीने डांबून ठेवल्यावर दिली होती

परप्रांतीय महिलेला ९ दिवस खोलीत डांबून लैंगिक अत्याचार; नराधमाला ठोकल्या बेड्या
सांगवी (बारामती): पर प्रांतीय महिलेला हॉटेलवर कामाचे आमिष दाखवून तिला पत्र्याच्या खोलीतआठ ते नऊ दिवस डांबून ठेऊन जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातील पणदरे येथून समोर आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व माळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा तात्काळ शोध घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. तर पत्राच्या खोलीत नऊ दिवस डांबून ठेवलेल्या महिलेची सुटका करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. पोपट धनसिंग खामगळ (वय २५ ), रा. खामगळवाडी, ता. बारामती, जि. पुणे) असे लैंगिक अत्याचार करणाऱ्या हॉटेल व्यावसायिक आरोपीचे नाव आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धक्कादायक बाब म्हणजे आरोपीवर यापूर्वी देखील बारामती शहर पोलीस स्टेशन व माळेगाव पोलीस ठाण्यात जबरदस्तीने महिले सोबत शारीरीक संबंध करून लैगिक अत्याचार केल्याचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. परप्रांतीय महिलेला खोलीत डांबून ठेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. सदरची घटना अतिशय संवेदनशील असल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, यांना सांगून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश प्राप्त करून घेतले. स्थानिक गुन्हे शाखा व माळेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई केली.
रविवार (दि. १२) रोजी माळेगाव पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी पणदरे गावातील घटनास्थळी गेले , त्या ठिकाणी एका हॉटेलचे बांधकाम चालू होते, सदर हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या खोल्यांची तपासणी केली. यावेळी खोलीत पिडीत महिला मिळून आली. तिला महिला अंमलदारांच्या मदतीने मानसिक आधार देवून विचारपूस केली असता, पिडीत महिला ही मुळ मध्यप्रदेशची असून तिचे पती हे तळेगाव दाभाडे येथील कंपनीतील काम सुटल्याने तो गावी गेल्याची माहिती पुढे आली.
पिडीत महिला एकटीच तळेगाव दाभाडे येथे काही महिन्यांपासून राहत होती.नंतर तळेगाव दाभाडे येथे कंपनीत काम करणाऱ्या मैत्रीणीकडून पोपट धनसिंग खामगळ याच्या सोबत ओळख झाली. त्याचा हॉटेल व्यवसाय आहे, असे सांगण्यात आले. त्यानंतर पोपट धनसिंग खामगळ याने पिडीतेस पणदरे येथील हॉटेल मध्ये काम करण्याचे १५ हजार पगार देण्याचे आमिष दाखवले.
आरोपी पोपट खामगळ याने (०२ जानेवारी) रोजी पिडीतेस बारामती येथे बोलावून घेवून तिला पणदरे येथे काम चालू असलेल्या हॉटेलवर नेले. (दि.०३) जानेवारी रोजी पहाटेच्या वेळी पिडीत महिला ही पत्र्याच्या खोलीत झोपलेली असताना पहाटेच्या वेळी आरोपी पोपट खामगळ याने पिडीतेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. कोणास काही एक सांगितले तर खून करील अशी धमकी दिली. तसेच तुझ्यावर पहारेकरी नेमले असून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर फिक्स खून करील अशी धमकी देत आरोपी खामगळने पिडीत महिलेस शनिवार (दि. ११) रोजी पर्यंत मारहाण करत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. नंतर पहाटे मारहाण करून पत्र्याच्या खोलीत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला व पिडीतेला त्या ठिकाणी डांबून ठेवले. त्यानंतर पिडीत महिलेने जोडप्यातील महिलेच्या फोन वरून तिच्या नातेवाईकास फोन करून सर्व झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर घटनेची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. माळेगाव पोलीस ठाण्यातील स्टाफच्या मदतीने रविवारी (दि. १२) रोजी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास पिडीतेची सुटका करण्यात आली. झालेल्या प्रकाराबाबत पिडीत महिलेने आरोपी पोपट खामगळ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे,सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक संध्याराणी देशमुख, देवा साळवे, अंमलदार अभिजीत एकशिंगे,स्वप्निल अहीवळे, अंमलदार राहुल पांढरे,विजय वाघमोडे,ज्ञानेश्वर मोरे, अर्चना बनसोडे,गोदावरी केंद्रे यांनी केली.