वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ३७ कुटुंबांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:12 AM2021-07-28T04:12:35+5:302021-07-28T04:12:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या भागात दरड कोसळून २०० जणांचा मृत्यू झाल्यानंतर पुणे आणि रायगड जिल्ह्यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या भागात दरड कोसळून २०० जणांचा मृत्यू झाल्यानंतर पुणे आणि रायगड जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील ३७ कुटुंबातील १५३ जणांचे स्थलांतर पुणे ग्रामीण पोलीस आणि महसूल विभागाने केले. रहिवाशांची शाळा, मंदिरे तसेच नातेवाईकांकडे निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना भोजन आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
वेल्हे तालुक्यातील कर्नवडी गाव महाड तालुक्याच्या हद्दीवर आहे. सह्याद्रीचा कडा उतरून कर्नवडीत जाता येते. वेल्हे तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तीन दिवसांपूर्वी घरांना तडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
वेल्हे तालुक्यातून रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात जाण्यासाठी दुर्गम भागातून जाणार्या शिवकालीन वाटा आहे. कडे-कपारीतून पायपीट करून महाड तालुक्यात उतरता येते. त्यानंतर रविवारी (२५ जुलै) मध्यरात्री दीडच्या सुमारास कडा कोसळून मोठा आवाज झाला होता.
वेल्हे पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार, तहसीलदार शिवाजी शिंदे, केळद गावचे सरपंच रमेश शिंदे यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांना स्थलांतराबाबतची विनंती केली. मात्र, ग्रामस्थ स्थलांतरित होत नव्हते. पवार, शिंदे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, पंचायत समिती सभापती दिनकर धरपाळे, नाना राऊत यांनी पुन्हा कर्नवडी, केळद, निगडे खुर्द भागातील ग्रामस्थांची भेट घेऊन संभाव्य धोक्याची जाणीव करून दिली. त्यानंतर ३७ कुटुंबांतील १५३ जणांचे स्थलांतर करण्यात आले. जेसीबी यंत्राच्या साहाय्याने कर्णवडी ते रानवडी रस्त्याची डागडुजी करण्यात आली.