मुळशी तालुक्यातील जमीन खचल्याने गुटके गावाचे स्थलांतर; माळीणची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 06:38 PM2022-07-06T18:38:41+5:302022-07-06T18:53:59+5:30
प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय...
पुणे : गेल्या काही दिवसांपासून घाट परिसरातील पावसाचा वाढता जोर पाहता जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भूस्खलनापासून खबरदारीचा उपाय म्हणून मुळशी तालुक्यातील घुटके गावातील 14 कुटुंबांना दरीतील मोकळ्या जमिनीवर बांधलेल्या तात्पुरत्या निवासी इमारतींमध्ये स्थलांतरित केले आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी गावाला भेट दिली.
या गावाच्या ठिकाणी भूगर्भशास्त्रज्ञांनी भेट दिली होती. तेथे काही प्रमाणात जमीन सरकल्याचे आढळले. कठोर खडकाच्या पृष्ठभागावर उप-पृष्ठीय प्रवाह देखील होता. ते धोकादायक असल्याने रहिवाशांना गेल्या वर्षी पुणे जिल्हा परिषदेने बांधलेल्या सभा मंडपात स्थलांतरित करण्यात होते. या पावसाळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने स्थलांतराचा निर्णय घेतला आहे.
फियाट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या मदतीने गावचे सरपंच श्री वायकर यांनी दान केलेल्या जमिनीवर प्रत्येकी 2 खोल्या असलेली 16 घरे बांधण्यात आल्या आहेत. याशिवाय, पुणे जिल्हा परिषदेने गोठा, पाणीपुरवठा योजना आणि इतर मूलभूत सुविधा बांधल्या. या ठिकाणी सौर दिवे देखील दिले आहेत. या निवासस्थानांसाठी पलंग आणि गाद्याही देण्यात आल्या आहेत.