पिण्याचं पाणी घेताना शेततळ्यात बुडून मायलेकींचा मृत्यू; बारामतीच्या अंजनगावातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 01:56 PM2021-09-15T13:56:38+5:302021-09-15T13:56:46+5:30
सुरवातीला पाण्यात पडलेल्या मुलीला वाचविण्याचा प्रयत्न करणारी आई आणि दुसरी मुलगी देखील पाय घसरुन पाण्यात पडली
बारामती : बारामती तालुक्यातील अंजनगावात पिण्याचं पाणी घेण्यासाठी गेलेल्या मायलेकींचा बुुडुन मृत्यु झाला. सुरवातीला पाण्यात पडलेल्या मुलीला वाचविण्याचा प्रयत्न करणारी आई आणि दुसरी मुलगी देखील पाय घसरुन पाण्यात पडली. यामध्ये मायलेकींचा मृत्यु झाला. मात्र, दुसरी मुलगी सुदैवाने बचावली आहे.
या घटनेत आईसह पाण्यात पडलेल्या तिघींपैकी बचावलेल्या मुलीमुळे हा दुर्दैवी प्रकार उघडकीस आला. अश्विनी सुरेश लावंड, समृद्धी सुरेश लावंड (वय १५) अशी या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मायलेकींची नावं आहेत. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार अश्विनी या आपल्या दोन मुलींसह शेतात बकऱ्या चारण्यासाठी जातात.
मंगळवारी(दि १४) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शेततळ्यातून बाटलीच्या मदतीनं पिण्यासाठी पाणी काढायला समृद्धी शेततळ्याच्या बाजूला गेली होती. त्यावेळी शेततळ्यात वापरलेल्या प्लास्टिकवरून पाय घसरल्यानं ती पाण्यात पडली. यावेळी मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात अश्विनी यांचा देखील पाय घसरला. दरम्यान, दोघींना वाचविण्याचा प्रयत्न करणारी दुसरी मुलगी श्रावणी देखील पाण्यात पडली. तिघी पाण्यात बुडाल्या,मात्र श्रावणी शेततळ्याच्या प्लास्टिक कागदाला धरून बाहेर पडली. तिने आरडाओरडा केल्याने हा प्रकार स्थानिक लोकांच्या लक्षात आला. दुर्दैवाने ग्रामस्थ जमा होण्यापुर्वीच अश्विनी आणि समृद्धी या मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.
घटनेची माहीती मिळताच बारामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. उद्योजक सुरेश परकाळे यांच्या पुढाकारानं साडेआठ वाजण्याच्या सुमारास बारामती येथील सतिश ननवरे, सुभाष बर्गे, महादेव तावरे यांच्या टीमला पाचारण करण्यात आले. या टीमच्या मदतीनं युवकांच्या मदतीने बुडालेल्या मायलेकींचा शोध घेऊन मृतदेह बाहेर काढण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी बारामतीच्या सिल्वर जुबली रुग्णालयात पाठवण्यात आले.या घटनेमुळे परीसरात शोककळा पसरली आहे.