'कोंढवा हे मिनी पाकिस्तान' असे वक्तव्य करणाऱ्या मिलिंद एकबोटेंना अटकपूर्व जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 20:15 IST2021-03-12T20:11:25+5:302021-03-12T20:15:19+5:30
संभाजी बिग्रेडतर्फे या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'कोंढवा हे मिनी पाकिस्तान' असे वक्तव्य करणाऱ्या मिलिंद एकबोटेंना अटकपूर्व जामीन मंजूर
पुणे : कोंढवा हे मिनी पाकिस्तान आहे. त्याचठिकाणी हज हाऊस बांधण्यात येणार आहे. येथे अतिरेक्यांचा स्लीपर सेल आहे. यामुळे पुणेकरांचा जीव धोक्यात येऊ शकतो, असे वक्तव्य करणाऱ्या समस्त हिंदू आघाडीच्या मिलिंद एकबोटे यांच्यावर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एकबोटे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या गुन्हयात एकबोटे यांना शुक्रवारी (दि.12 ) अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.पी. आगरवाल यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.
संभाजी बिग्रेडतर्फे या प्रकरणी फिर्याद देण्यात आली आहे. मिलिंद एकबोटे यांच्यातर्फे अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अॅड. एस. के. जैन, अॅड,अमोल डांगे यांनी कोटांत अर्ज दाखल केला होता. एकबोटे यांच्यावर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध शाहाफाजील मोईनुदद्दीन सिद्दीकी आणि सतीश भास्कर काळे यांनी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी दाखल गुन्हयात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून मिलिंद एकबोटे यांनी अर्ज दाखल केला होता.
अॅड. एस. के. जैन आणि अॅड. अमोल डांगे यांनी कोर्टात युक्तिवाद करताना सांगितले. या प्रकरणी फिर्याद उशिरा दाखल करण्यात आली आहे. अर्जदार यांनी फक्त लक्षात आणून दिले की, हज हाऊस या गोष्टींची बांधणी सिव्हिल आणि कल्चरल सेंटरच्या नावाखाली करण्यात येत आहे. संबंधित जागा पुणे महानगरपालिकेच्या ताब्यातील आहे. अर्जदार तपासक सहकार्य करण्यास तयार आहेत. पोलिस कस्टडीतील चौकशीची गरज नाही. त्यामुळे या प्रकरणी अर्जदारालाअटकपूर्व जामीन मंजूर करण्यात यावा. हा युक्तिवाद मान्य करत कोर्टाने मिलिंद एकबोटे यांचा जामीन मंजूर करून १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर सोडण्याचा आदेश दिला.अर्जदाराने साक्षी पुराव्यात हस्तक्षेप करू नये या अटीवर कोर्टाने एकबोटे यांना अंतरिम जामीन मंजूर केला.