आनंदी कोविड सेंटरला मिलिंद मोहिते यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:11 AM2021-05-12T04:11:16+5:302021-05-12T04:11:16+5:30
सासवड : पुणे जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी ...
सासवड :
पुणे जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी ग्रामीण संस्था संचलित आनंदी जम्बो कोविड सेंटर खळद येथे भेट दिली. आम्बळे येथील सार्थक सेवा संघाच्या वसतिगृहातील अनाथ २१ मुले आणि पर्यवेक्षिका सपना क्षीरसागर असे २२ जण एकाच वेळी कोरोनाग्रस्त झाले होते. वसतिगृह व्यवस्थापनाने संपर्क करताच आमदार संजय जगताप आणि ग्रामीण संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांनी तातडीने सर्वांना दाखल करून घेतले. सासवडचे बालरोगतज्ज्ञ डॉ. विनायक बांदेकर यांच्या निरीक्षणात गेले पाच सहा दिवस मुले उपचार घेत आहेत. याच बातमीची दखल घेत अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी आज कोविड सेंटरला भेट देऊन सर्व मुले आणि रुग्णांची विचारपूस करून उपचाराची माहिती घेतली. आनंदी कोविड सेंटरच्या सुरु असलेल्या रुग्णसेवेचा संपूर्ण आढावा घेत मिलिंद मोहिते यांनी समाधान व्यक्त केले. डॉक्टर आणि परिचारिका यांनाही त्यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या. या वेळी ग्रामीण संस्था संचालक मुन्ना शिंदे, पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष सागर मोकाशी, शिक्षकनेते संदीप जगताप, डॉक्टर मयूर अग्रवाल हे उपस्थित होते.
आनंदी कोविड सेंटरला अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी भेट दिली.