बदलत्या युध्दशैलीनुसार लष्करी शिक्षण : मायकल मैथ्युज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 07:44 PM2020-01-30T19:44:51+5:302020-01-30T20:07:49+5:30
१८२० साली स्थापन झालेल्या बॉम्बे सॅपर्सला यावर्षी २०० वर्षे पूर्ण युध्दभूमीत जलद गतीने काम करण्यासाठी सॅपर्सकडून काम
पुणे : लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात बदलत्या युध्द शैलीनुसार जवानांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, याकरिता कृत्रिम बुध्दिमत्ता व यंत्रमानाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे व बॉम्बे सॅपर्सचे कमांडन्ट कर्नल मायकल मैथ्युज यांनी दिली.
खडकी येथील बॉम्बे सॅपर्सला दोनशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दिघी येथे खास पॅरा डायव्हिंग व पॅरा ड्रॉप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस, ब्रिगेडीअर एम. जे. कुमार यावेळी उपस्थित होते.
मैथ्युज म्हणाले, युध्द भूमीत जलद गतीने काम करण्यासाठी सॅपर्सकडून काम केले जाते. युध्दभूमीत हॅलिपॅड बांधणे, ट्रॅक तयार करणे, पुल बांधणे या कामांसह, शत्रु राष्ट्राची गतीशीलता कमी करण्याचे महत्वाचे कामही सॅपर्सला करावे लागते. बॉम्बे सॅपर्सने पहिल्या व दुसऱ्या महायुध्दात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या दोन्ही युध्दातील कामगिरीबद्दलचे महत्त्वाचे पुरस्कारही बॉम्बे सॅपर्सला मिळालेले आहेत. १८२० साली स्थापन झालेल्या बॉम्बे सॅपर्सला यावर्षी २०० वर्षे पूर्ण झाली आहेत. सॅपर्सच्या इतिहासाची आठवण करून देण्यासाठी गेल्या वर्षभरापासून देशभरातील सॅपर्सच्या सर्व शाखांमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात येत असून, यामध्ये सॅपर्सचे अनेक निवृत्त अधिकारी व जवानही आवर्जुन सहभागी झाले आहेत. आजच्या पॅरा डायव्हिंगमध्ये ५९ पॅरा ड्रॉप झाले असून, यामध्ये सॅपर्सच्या निवृत्त अधिकाऱ्यांनीही सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले.
----------------------
वयाची सत्तरी पार केलेल्या अधिकाऱ्यांकडून पॅरा डायव्हिंग
बॉम्बे सॅपर्सच्या माध्यमातून सेवा बजाविलेल्या व वयाची सत्तरी पार केलेल्या दोन निवृत्त अधिकाऱ्यांनी दिघी येथील पॅरा डायव्हिंग कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यांनी सहा हजार फूटावरून जंम्प करून यावेळी जवानांचा उत्साह वाढविला. सेवा निवृत्त लेफ्टनंट जनरल आर. आर. गोस्वामी आणि निवृत्त ब्रिगेडीअर एस आर माजगावकर अशी या सत्तरी पार केलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
या कार्यक्रमात बॉम्बे सॅपर्सच्या एकूण ५९ अधिकारी आणि जवानांनी लष्कराच्या लढाऊ विमानातून ६ ते १२ हजार फूट उंचीवरुन उडी घेऊन उपस्थितांचे मने जिंकली. सदर पॅरामध्ये सहभाग घेतलेल्या बहुतांशी जणांचे वय हे ५० च्या पुढेच होते. यामध्ये मेजर जनरल एस.के. जसवाल (सेवानिवृत्त), लेफ्टनंट जनरल एस एस हसबनीस, लेफ्टनंट जनरल योगेंद्र डिमरी, ब्रिगेडियर एम़जे़ कुमार आदींचा समावेश होता.