पाकिस्तानवरील कारवाईचे लष्करी अधिका-यांनी केले स्वागत

By admin | Published: May 23, 2017 08:33 PM2017-05-23T20:33:16+5:302017-05-23T20:33:16+5:30

भारतीय लष्कराने नैशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या चौक्या उद्धवस्त करुन पाकिस्तानला योग्य तो धडा दिला असल्याचे सांगत निवृत्त लष्करी अधिका-यांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.

Military officials from Pakistan are welcomed to take action | पाकिस्तानवरील कारवाईचे लष्करी अधिका-यांनी केले स्वागत

पाकिस्तानवरील कारवाईचे लष्करी अधिका-यांनी केले स्वागत

Next

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 23 - भारतीय लष्कराने नैशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या चौक्या उद्धवस्त करुन पाकिस्तानला योग्य तो धडा दिला असल्याचे सांगत निवृत्त लष्करी अधिका-यांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. यापुढे जर पाकिस्तानने आगळीक केली तर त्यांना असे यापुढेही उत्तर दिले जाईल, असा संदेशही या कारवाईतून दिल्याचे त्यांनी सांगितले़ तसेच पाकिस्तान आता घुसखोरीसाठी कोणत्या जागेची निवड करेल, हे शोधून काढण्याचे काम गुप्तचरांनी करावे लागेल, असे त्यांनी सांगितले़. 
 
डॉ़. दत्तात्रय शेकटकर (निवृत्त, लेफ्टनंट जनरल) : सर्वप्रथम लष्कराने ही कारवाई १० मेच्या रात्री झाली होती, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ज्या क्षेत्रात आपल्या लष्कराने ही कारवाई केली, त्या ठिकाणी पाकिस्तानच्या सैन्याने भारतीय गावांवर गोळीबार करुन त्यात आपल्याकडील महिला, मुलांचा मृत्यु झाला होता़. त्यावेळी केंद्र सरकारने भारतीय लष्कराला त्याचे प्रतिउत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले़. संरक्षणमंत्री, गृहमंत्री यांनी आम्ही कधी, कोठे आणि केव्हा उत्तर देऊ ते आम्ही ठरवू असे सांगितले होते़ त्याप्रमाणे ही कारवाई झाली आहे़. 
भारतीय सैन्याने कारवाई करता केवळ पाकिस्तानच्या सैनिकांना दंडित केले आहे़ त्यांनी पाकिस्तानमधील मुले, महिला नागरिकांवर हल्ला केला नाही़ हे फक्त भारतच करु शकतो़ पाकिस्तान सैन्याला दंड देण्यासाठीच ही कारवाई केली गेली आहे़ केंद्र शासनाने सैन्याला निर्देश दिले आहेत की, तुम्हाला उचित वाटेल, त्यानुसार तुम्ही कारवाई करु शकता़ मागच्या ६० वर्षात असे निर्देश नव्हते़ गेली ४० वर्षे मी लष्करी सेवेत होतो़ १९६५ च्या युद्धात लेफ्टनंट जनरल म्हणून सेवा बजावली आहे़ त्यावेळीही इतके स्पष्ट निर्देश कधीही मिळाले नाहीत़.
मी या शासनाचा प्रवक्ता नाही, पण युद्धशास्त्राचा अभ्यासक म्हणून एक सांगू शकतो की, या शासनाने आम्ही आता हे सहन करणार नाही़ कोणत्याही हल्ल्याला आम्ही धडा शिकवणार, हे पाकिस्तानला कारवाई करुन उत्तर दिले आहे़ आज लष्करी अधिका-यांनी शासनस्तरावर सांगितले की, आम्ही आवश्यकता वाटल्यास व आम्हाला कोणी बाध्य केल्यास यापुढेही कारवाई करु़ पाकिस्तानला दिलेली ही सूचना योग्य आहे. 
या कारवाईने भारताने दाखवून दिले आहे की, किती कठोर दंड केला ते महत्वाचे नाही तर, शस्त्रूने आगळीक केली तर आम्ही दंड नक्की करु, हे शस्त्रूला स्पष्टपणे सांगितले आहे़ हा फार मोठा संदेश लष्कराने दिला आहे़ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड टम्प यांनी सौदी अरेबियात ५५ देशांच्या राष्ट्रप्रमुखासमोर दहशतवादाविरुद्ध एकत्र येण्याचा निर्णय घेतला़ पाकिस्तान आपल्या कमतरतेवर कधीही त्यांच्या जनतेला काही सांगत नाही़ त्यामुळे नाईलाजाने भारताने आता ही कारवाई जाहीर केली असावी़ 
शेवटी तुमचे युद्ध दुसरा कोणी लढणार नाही तर ते तुम्हालाच लढावे लागेल़  अमेरिका तुमच्यासाठी लढणार नाही त्यापेक्षा प्रत्येक राष्ट्राला आपली राष्ट्रनिती महत्वाची असते़ त्यामुळेच भारतीय लष्कराने केलेल्या या कारवाईचे स्वागत केले पाहिजे़. 
 
 
व्ही़ के़ मधोक (निवृत्त मेजर जनरल) : अनेक दिवसांपासून या कारवाईची प्रतिक्षा होती़ गेल्या काही दिवसात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही बाजूकडून गोळीबार केला जात आहे़. पाकिस्तानकडून प्रॉक्सी वॉर खेळले जात आहे़. ज्या नैशेरा सेक्टरमध्ये ही कारवाई करण्यात आली त्या ठिकाणी बिग्रेड कमांडर म्हणून १९७१ मध्ये काम केले आहे़. सुंदरबनी, नैशेरा हे जवळजवळ आहे़ या ठिकाणी दोन्ही सैन्यांचे तळ ते एकमेकांपासून १०० ते २०० मीटर वर आहेत़ डोंगराळ भाग व नदीनाले यामुळे येथे नियंत्रण रेषा ही सरळ नाही़ त्यामुळे दोन्ही बाजूच्या सैन्याला प्रत्येकाची माहिती असते़ कोठून घुसखोरी होईल, याची कल्पना असते़ येथे तोफखान्याच्या मदतीने पाकिस्तानची ठाणी उद्धवस्त करण्यात आली आहे़ हे चांगले काम केले आहे़. 
या पूर्वीच्या चारही लढायांमध्ये पाकिस्तानने अचानक घुसखोरी करुन आपल्यला सुरुवातीला चकीत केले होते़ नंतर आपण विजय मिळविला असला तरी सुरुवातीला त्यांनी नक्कीच चकीत केले़ अशाप्रकारे पुन्हा पाकिस्तान घुसखोरी करुन चकीत करणार नाही हे पाहिले पाहिजे़ जम्मू, पुंच, बारामुल्ला, अशा ठिकाणी आपले लष्कर सतर्क असते़ तोफखाना उत्तर देण्यास सज्ज असतो़ त्यामुळे यापुढे याभागात घुसखोरी होण्याची शक्यता कमी आहे़ मग, पाकिस्तान आणखी कोठे घुसखोरी करु शकेल, याची माहिती काढण्याचे काम गुप्तचरांचे आहे़ लडाख सीमा रेषेपासून उत्तरप्रदेशपर्यंतची सीमा खुली आहे़ चीनच्या मदतीने पाकिस्तान घुसखोरी करु शकतो, हा धोका आपण ओळखला पाहिजे़. 
हेमंत महाजन, (निवृत्त ब्रिगेडीअर) :   भारतीय लष्कराने नौशेरा भागात पाकीस्तानी चौक्या रॉकेट, अ‍ॅन्टी टँक माईन तसेच इतर शस्त्रांच्या साह्याने नष्ट केल्या. घुसखोरी आणि दहशदवाद्याविरोध केलेली ही कारवाई स्वागतार्ह्य आहे. यामुळे सर्वांचे मनोबल वाढले असून पाकिस्तानला धडा मिळाला आहे. या कारवाईमुळे या परिसरातून होणारी घुसखोरी काही काळ थांबेल. पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय हद्दीत दहशदवाद्यांना घुसण्यासाठी या सारख्या चौक्यांमधून फायरींग करून त्यांना संरक्षण पुरवत असते. थेट त्याच्यावर कारवाई केल्याने घुसखोरी थांबवण्यात यश आले आहे. या प्रकारच्या चौक्यांमध्ये जवळपास ५० ते ६० सैनिक असतात. तसेच दारूगोळा ठेवलेला असतो. यात पाकिस्तानचे किती सैनिक मारले गेले हे अजुन समजायचे आहे. मात्र, तेथील दारूगोळा पूर्ण नष्ट झाला आहे. या सारख्या कारवायांमुळे पाकिस्तानच्या कुरापती थांबतील हे म्हणणे चुकीचे आहे. गेल्या आठवड्यात कृष्णा घाटीत भारतीय सैनिकांच्या शरीराची बिटंबना केली त्याचा वचपा या कारवाईतून घेण्यात आला आहे. दरवर्षी भारतात जवळपास १००० ते १५०० घुसघोर भारतीय हद्दीत प्रवेश करतात. गेल्या काही दिवसांतील कारवायांमुळे हे प्रमाण कमी झाले आहे. या सारख्या कारवायांमध्ये वाढ होणे गरजेचे आहे. पाकिस्तानही याला प्रत्यूतर देऊ शकतो. त्यावर काऊंटर अटॅक केल्यास घुसखोरीला आळा घालता येईल. 

Web Title: Military officials from Pakistan are welcomed to take action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.