दूध व्यवसाय पुन्हा संकटाच्या भोवऱ्यात !....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:09 AM2021-05-19T04:09:45+5:302021-05-19T04:09:45+5:30
कान्हूरमेसाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी कोलमडलेला दूध व्यवसाय यंदा स्थिर होत असताना पुन्हा एकदा दुसऱ्या लाटेत कोलमडला आहे. ...
कान्हूरमेसाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी कोलमडलेला दूध व्यवसाय यंदा स्थिर होत असताना पुन्हा एकदा दुसऱ्या लाटेत कोलमडला आहे. दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी घट झाली आहे, त्यामुळे दूध व्यवसायिक चिंतेत पडला आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दूध उत्पादकांवर मोठे संकट आले आहे. दूध दर तब्बल तीस रुपयांवरून कमी होऊन २५ रुपयांवर हिरावला होता तर त्यामध्ये अजून दोन रुपये कमी होऊन ते वीस रुपया वर आल्याचे पाहावयास मिळत आहे. हे दिवस असेच राहिले तर छोटे दूध व्यवसायिक संपुष्टात येण्यास वेळ लागणार नाही. दूध उत्पादकांसाठी सध्या दूध उत्पादनासाठी ३० ते ३२ रुपये खर्च येत आहे तर हेच दूध सद्यस्थितीला ते तेवीस रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना प्रती लिटर १० ते १२ रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. दोन महिन्यात दूध दरात वाढ झालेली पाहता दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गाई म्हशींची खरेदी करून दूध उत्पादनास सुरुवात केली होती. मात्र, कोरोनाच्या दुसरा लाटेमध्ये दूध उत्पादक संकटात सापडला असल्याचे श्रीराम डेरीचे चेअरमन दत्ता खैरे व रमेश खैरे यांनी सांगितले.
-ग्राहकांना फायदा नाही
खासगी कंपन्यांनी दूध खरेदी दर तब्बल तीस रुपयावरून तेवीस रुपये वर आणले आहेत. मात्र, दुधाच्या पिशवीचा विक्री दरात कोणत्याही प्रकारची घट झाल्याचे पाहावयास मिळत नाही तर दूध दर कमी होण्यामागे लॉकडाऊनचे कारण पुढे केले जात आहे. त्यामुळे ना ग्राहकांना दूध दर कमी झाल्याचा फायदा झाला ना शेतकऱ्यांना झाला. त्यामुळे केवळ दूध डेअरी चालकांना, संकलन केंद्रांना मात्र याचा फायदा झाल्याचे स्पष्ट होत आहे.
------------
लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. गेल्यावर्षीचा दूध उत्पादनात मोठा तोटा सहन केला आहे. आता कुठेतरी दोन महिने परिस्थिती सुधारली की लगेच कोरूना चे व लॉकडाऊन चे कारण देत सुद्धा दुधाचे दर परत कमी केले आहेत दूध व्यवसाय करायचा तरी कसा असा प्रश्न पडत आहे
- संतोष खैरे दूध उत्पादक खैरेनगर तालुका शिरूर