दूध संस्था बंद : निवडणूक प्रक्रिया मात्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 01:39 AM2018-10-16T01:39:18+5:302018-10-16T01:39:35+5:30
५ वर्षांपासून वेताळेश्वर सहकारी दूध उत्पादक संस्था बंद असून, त्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.
दावडी : मांजरेवाडी, पिंपळ (ता. खेड) येथे गेल्या १५ वर्षांपासून वेताळेश्वर सहकारी दूध उत्पादक संस्था बंद असून, त्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे; मात्र मनमानी सभासद करून संस्थेचे आॅडिट करून निवडणूक घेण्याची तयारी सुरू झाली आहे.
जो सभासद वार्षिक कमीत कमी २५० लि. दूध डेअरीत पुरवितो, मात्र या गावातून १ लिटरसुद्धा दूध या डेअरीत जात नसताना त्यांना सभासद करून मतदानास पात्र ठरविले आहे. नावापुरत्या असलेल्या संस्था काय कामाच्या, असा प्रश्न ग्रामस्थांनी केला असून, याबाबत मांजरेवाडी ग्रामस्थांनी ही निवडणूक रद्द करावी अशी मागणी सहायक (पदुम) निबंधक सहकार संस्था दुग्ध विभागाकडे केली आहे.
ग्रामीण भागातील दूध संकलन करण्यासाठी उत्पादन वाढविण्यासाठी दूध उत्पादक सहकारी संस्थांची भूमिका फार महत्त्वाची असते. सहकार तत्त्वावर सुरू झालेल्या या संस्थांच्या माध्यमातून दूध उत्पादकांनाही मोठा आधार मिळत आला आहे; काही शेतकऱ्यांकडे गाय, म्हशी नसतानाही त्यांना सभासद करून घेतले असल्याचे चित्र दिसत आहे. आर्थिक पत्रके सादर करून निबंधक कार्यालयात दरवर्षी लेखा परीक्षण अहवाल सादर करुन निवडणुकीसाठी काही सभासदांकडे गाई-म्हशी नसतानाही सभासद नोंदणी केली असल्यांचा आरोप मांजरेवाडी ग्रामस्थांनी केला आहे.
मांजरेवाडी येथे वेताळेश्वर दूध उत्पादक संस्था गेल्या १५ वर्षांपासून बंद असूनही निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. घरातले नात्यातील लोकांना, तसेच धक्कादायक बाब एका घरातील ७ सभासद म्हणून घेण्यात आले आहे. यामध्ये मृत ४ सभासद आहेत. त्यांची ही नावे सभासद म्हणून घेण्यात आली असल्याने सावळा गोंधळ सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.