आळेफाट्याला रस्त्यावर ओतले दूध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 06:35 PM2018-06-01T18:35:10+5:302018-06-01T18:35:10+5:30
दुधउत्पादक शेतकऱ्यांनी दुध ओतून या मागणीकडे लक्ष वेधत रास्ता रोको आंदोलन केले.
आळेफाटा : दुधाला दिलेला हमीभाव मिळावा यासाठी आळेफाटा (ता. जुन्नर) चौकात दुधउत्पादक शेतकरी यांनी दुध ओतून या मागणीकडे लक्ष वेधत रास्ता रोको आंदोलन केले. येत्या काही दिवसांत हमीभाव न मिळाल्यास दुध उत्पादक शेतक-यांचे नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा आमदार शरद सोनवणे यांनी यावेळी दिला. शासनाने दिलेला हमीभाव मिळावा या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी आळेफाटा चौकात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी शेतकरी सकाळीच आळेफाटा चौकात येण्यास सुरवात झाली होती. आंदोलनापुर्वी चौकात सभा घेण्यात आली.
दरम्यान शासनाच्या शेतकरी विरोधी धोरण अवलंबले असल्याने दुध दरासाठी शेतकरीवर्गावर आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे जिल्हा दुध संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी यांनी यावेळी बोलताना सांगितले. तर दुध दरात वाढीबाबत वारंवार दुग्ध विकास मंत्री यांचेकडे पाठपुरावा केला असल्याचे आमदार शरद सोनवणे यांनी यावेळी बोलताना सांगत सहकाराची गळचेपी करण्याचे धोरण सध्या राबविले जात असून यामुळे दुधासह इतरही पिकांचे योग्य दरासाठी रस्त्यावर उतरावे लागणार असल्याचे शेवटी बोलताना सांगितले. विघ्नहरचे माजी उपाध्यक्ष भीमाजी गडगे पंचायत समिती सदस्य भाऊ देवाडे माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कु-हाडे गोविंद घाडगे शिवाजी हाडवळे यांनीही यावेळी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, प्रसन्न डोके, वडगाव आनंद सरपंच शशिकांत लाड, आळे उपसरपंच मिननाथ शिंदे, गंगाराम गुंजाळ, नेताजी डोके, प्रदीप देवकर, अशोक गडगे, सचिन वाळुंज, कैलास वाळुंज गणेश वाघमारे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान यानंतर शेतकरीवर्गाने चौकात येत काही वेळ रास्ता रोको आंदोलन केले. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर दुध ओतले. तर मंडळाधिकारी डी.बी.काळे व रोहिदास वामन यांनी यावेळी शेतक-यांचे निवेदन स्वीकारले. आळेफाटा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारूती खेडकर यांचे मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.