दूध दरवाढीची टांगती तलवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 07:08 IST2018-12-09T02:57:34+5:302018-12-09T07:08:06+5:30
काचेच्या बाटलीतून दूधपुरवठ्याचा पर्याय; पर्यावरणमंत्र्यांसमवेत होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

दूध दरवाढीची टांगती तलवार
बारामती/लासुर्णे : शासनाने काढलेल्या एपीआर कायद्यान्वये प्लॅस्टिकबंदी केल्यामुळे त्याचा थेट दूध व्यवसायावर परिणाम होणार आहे. प्लॅस्टिक बंद झाल्यास दूध पॅकिंग करण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. प्लॅस्टिकबंदीला काचेच्या बाटलीतून पॅकिंग केलेल्या दुधाचाच पर्याय आहे. मात्र, असे झाल्यास दुधाचे दर वाढावे लागणार असल्याने ग्राहकांवर दूधदर वाढीची टांगती तलवार आहे. येत्या मंगळवारी (दि.११) पर्यावरणमंत्र्यांसमवेत होणाऱ्या बैठकीकडे या विषयावर चर्चा होणार आहे. त्यानंतर दुधदरवाढीचे भवितव्य ठरणार आहे. यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फूड प्रोसेसिंग व्यवसाय या आदेशातून वगळण्यात यावा, अशी मागणी दूध व्यावसायिकांमधून होत आहे. राज्य सरकारने प्लॅस्टिकच्या पॉलिथीन पिशव्या उत्पादन करणाºया कंपन्यावर काही निर्बंध घातले आहेत. परिणामी या पिशव्यांवर गदा आली आहे. दुधाची पिशवी उत्पादक संघामधून मुख्य वितरक, उपवितरकांनंतर विक्रेत्यामार्फत ग्राहकापर्यंतपुरवठा होतो. याच साखळीमधून पिशवी ती पिशवी उत्पादक संघाकडे आणण्याचा पर्याय सुचविण्यात आला होता. मात्र, हा पर्याय उपयुक्त नसल्याचे सांगत बहुतांश दूध संघांनी त्याला नकार दिला आहे. या पार्श्वभुमीवर प्लॅस्टिक पिशवीऐवजी दूध काचेच्या बाटलीत द्यायचा एक मेव पर्याय आहे. या पर्यायाचा अवलंब झाल्यास त्या दुधाची किंमत वाढणार आहे. त्यामुळे दुधाची वाढणारी किंमत सर्वसामान्य ग्राहकाच्या खिशाला परवडणारी नाही. काचेच्या बाटलीत दूध देण्याचा पर्यायाची चाचपणी करणे आवश्यक आहे.
या बाटलीची हाताळणी, काळजीपूर्वक वाहतूक, वापरानंतर निर्जंतूक करणे आदी बाबींचे नियोजन दूध उत्पादक संघांना करावे लागणार आहे. बाटलीचा वापर झाल्यास दुधाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची धास्ती ग्राहकांना आहे. त्यामुळे राज्य शासन येत्या मंगळवारी (दि.११) होणाºया बैठकीत घेणाऱ्या निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकुणच प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर थांबवावा लागत असल्याने काचेच्या बाटल्यातून दूध पुरविण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांवर प्रतिलिटर दुधामागे १० ते १५ रुपयांचा वाढीव भार पडण्याची शक्यता आहे.
शासनाने पुनर्विचार करावा
शासनाने काढलेल्या एपीआर कायद्यामुळे दूध संघांना जर पॉलिथिन मिळणार नाही. त्यामुळे दूध पॅकिंग करण्याची अडचण होणार आहे. दूध संघातील दूध पॅकिंग न झाल्यामुळे शेतकºयांचे दूध घेणार कसे, असा प्रश्न उपस्थित होणार आहे. तसेच शासनाच्या नियमानुसार बाटलीमध्ये दूध पॅकिंग करणे आवश्यक आहे. रोज पॅकिंग लाखो लिटर असल्याने, काचेच्या बाटलीची उपलब्धता, त्याचा खर्च परवडणारा नाही. शासनाने यावर विचार करावा.
- दशरथ माने, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खासगी दूध उत्पादक संघ
प्लॅस्टिकबंदीमुळे दूध पॅकिंगची अडचण होणार आहे. काचेच्या बाटलीमध्ये दूध पॅकिंग केल्यास होणारा खर्च परवडणारा नाही, असे झाल्यास दुधाच्या एका लिटरमागे किंमत दहा ते पंधरा रुपयांनी वाढणार असल्याने याचा भुर्र्दंड सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा नाही.
-अर्जुन देसाई, अध्यक्ष,
नेचर डिलाइट डेअरी, कळस
शेतकरी अगोदरच दुष्काळाच्या छायेत आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते. याचा थेट परिणाम शेतकºयावर होणार असल्याने शासनाला विनंती केली आहे. प्लॅस्टिक बंदीतुन या व्यवसायाला वगळण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. येत्या ११ डिसेंबरला पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासमवेत बैठक असून यात तोडगा काढण्याची मागणी केली आहे.
- प्रकाश कुतवळ,
अध्यक्ष, ऊर्जा दूध
प्लॅस्टिक दूध पिशवी बंदीचे स्वागत आहे. मात्र, काचेच्या बाटलीमुळे दूध संस्थांचा खर्च वाढणार आहे. दूध घरपोहोच करणे, पुन्हा रिकामी बाटली जमा करण्याचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे लिटरमागे अंदाजे १० रुपये दर वाढण्याची शक्यता आहे. अगोदरच ४० रुपये प्रतिलिटरने दूध खरेदी करणे ग्राहकांना परवडत नाही. त्या ग्राहकांवर ५० रुपये प्रतिलिटरने दूध खरेदी करण्याची वेळ येणार आहे.
- डॉ. रवींद्र सावंत,
अध्यक्ष, सावंत डेअरी प्रा. लि.
काचेच्या बाटलीमुळे दुधाची किंमत वाढणार आहे. तसेच डेअरी कामगार, वाहतुकीचा ताण वाढणार आहे. एक लिटर दुधासाठी ३ बाटल्या ठेवाव्या लागतील. बाटल्यांमुळे दुधाची किंमत वाढणार असल्याने ग्राहक सुट्या दुधाकडे वळण्याची देखील शक्यता आहे. याचा आर्थिक फटका दूध उत्पादकांना बसणार आहे.
-सोमनाथ होळकर, अध्यक्ष,
होळकर दूध अॅग्रो प्रॉडक्ट्स