दूध उत्पादकांचे सव्वादोनशे कोटी रुपयांचे अनुदान थकले- राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 02:41 AM2018-12-09T02:41:43+5:302018-12-09T02:42:06+5:30

थकबाकी न दिल्यास दूध अनुदान योजनेतून बाहेर पडणार

Milk producers lose Rs. 500 crore subsidy - Raju Shetty | दूध उत्पादकांचे सव्वादोनशे कोटी रुपयांचे अनुदान थकले- राजू शेट्टी

दूध उत्पादकांचे सव्वादोनशे कोटी रुपयांचे अनुदान थकले- राजू शेट्टी

googlenewsNext

पुणे : दुष्काळ आणि चाराटंचाईमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर जनावरे विक्रीस काढत असल्याने जनावरांना भाव मिळत नाही, तर दुसरीकडे दुधाचे सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळातील दोनशे ते सव्वादोनशे कोटी रुपयांचे अनुदान सरकारने थकवल्याने काही दूध उत्पादक संघांनी उत्पादकांना कमी दर देण्यास सुरुवात केली आहे. सरकारने येत्या ११ डिसेंबरपर्यंत अनुदानाची रक्कम देण्याबाबत पावले न उचलल्यास सरकारच्या अनुदान योजनेतून बाहेर पडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.

दुधाला भाव मिळत नसल्याने ‘स्वाभिमानी’सह विविध शेतकरी संघटनांनी जुलै महिन्यात दूध बंद आंदोलन केले होते. त्यानंतर राज्य सरकारने दुधाला प्रतिलिटर ५ रुपयांचे अनुदान जाहीर केले. त्यामुळे दूध उत्पादकांना लिटरमागे २५ रुपयांचा भाव दिला होता. आॅगस्ट महिन्यात राज्य सरकारने दीडशे कोटी रुपयांचे अनुदान दूध संघ व खासगी डेअरीला दिले. काही दूध उत्पादक संघांना सप्टेंबर महिन्याच्या दोन आठवड्यांचे अनुदान मिळाले आहे. त्यानंतर कोणालाच अनुदान मिळाले नाही.

दूध उत्पादक संघ माहिती देत नसल्यात नाही तथ्य
शेट्टी म्हणाले, दुधाला अनुदान देण्यात चालढकल होत आहे. त्यामुळे सोलापूर आणि अहमदनगर येथील दूध उत्पादक संघांनी २० रुपये लिटरप्रमाणेच उत्पादकांना पैसे देण्यास सुरुवात केली आहे, तर उर्वरित ५ रुपये सरकारचे अनुदान जमा झाल्यानंतर देऊ, असे सांगितले जात आहे. सरकार एकीकडे पुरेसा निधी असल्याचे सांगत आहे. उलट दूध उत्पादक संघच माहिती देत नसल्याने अनुदान रखडल्याचे सरकार म्हणते. मात्र, त्यांच्या या दाव्यात तथ्य वाटत नाही.

दुष्काळाच्या स्थितीमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर जनावरे विक्रीस काढत असल्याचे चित्र जनावरांच्या बाजारात दिसून येत आहे. मागणीच्या तुलनेत जनावरे विक्रीसाठी अधिक उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना किंमत मिळत नाही, तर सध्या दुधाचे चांगले उत्पादन होत आहे. त्यातच अनुदान मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. सरकारने वेळच्या वेळेत अनुदान न दिल्यास या योजनेतून बाहेर पडू, असे शेट्टी म्हणाले.

Web Title: Milk producers lose Rs. 500 crore subsidy - Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.