दूध खरेदी दरात नवीन वर्षांत एक रुपायाने दर वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:09 AM2020-12-25T04:09:43+5:302020-12-25T04:09:43+5:30
विष्णू हिंगे : पुणे जिल्हा सहकारी दूध संघाच्या बैठकीत निर्णय लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध ...
विष्णू हिंगे : पुणे जिल्हा सहकारी दूध संघाच्या बैठकीत निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (कात्रज डेअरी) एक जानेवारी पासून गायीच्या दुधाच्या खरेदी दरात प्रति लिटर एक तर म्हशीच्या दुधात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. खरेदी दरात वाढ केली असली तरी विक्री दरात कोणतीही वाढ करणार नसल्याचे संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी स्पष्ट केले.
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची एकसष्ठावी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी ऑनलाइन घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
सभेच्या सुरुवातीस विष्णु हिंगे यांनी सांगितले की, २०१९-२० या आर्थिक वर्षात २ कोटी ४८ लाख ८५ हजार इतका निव्वळ नफा झालेला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लि. एक रुपयांप्रमाणे एकूण सुमारे ६ कोटी ९४ लाख रुपये दोन टप्प्यात देण्यात येत आहेत. प्रति लिटर पन्नास पैसे प्रमाणे होणारी रक्कम दिवाळीपूर्वी दूध उत्पादक शेतकऱ्यांना अदा केली तर उर्वरित रक्कम मार्च २०२१ पूर्वी अदा केली जाणार आहे.
चौकट
कोरोना काळातही संघाची भरभराट
“कोरोना महामारीतही संघाने योग्य खबरदारी घेतल्याने संघाची आर्थिक घडी फार विस्कळीत झाली नाही. परिणामी दूध उत्पादकांचेही नुकसान झाले नाही. यावर्षी गणेशोत्सव व दीपावलीमध्ये संघाच्या मिठाई विक्रीत मोठी वाढ झाली. संघाची गणेशोत्सवामध्ये सुमारे २१ टन मोदक व पेढे व मिठाईची विक्री झाली असून दसरा सणाच्या वेळी ८ टन मिठाई, ९ टन श्रीखंड/ आम्रखंड तर दीपावलीमध्ये २१ टन मिक्स मिठाईची विक्री झालेली आहे.”
- विष्णू हिंगे, अध्यक्ष कात्रज दूध संघ