दूध खरेदी दरात १ रुपयाने वाढ; शेतकऱ्यांना कात्रज दूध संघाकडून नवीन वर्षांची भेट 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 03:29 PM2020-12-24T15:29:26+5:302020-12-24T15:46:44+5:30

पुणे जिल्हा सहकारी दूध संघाच्या बैठकीत निर्णय 

Milk purchase price hike by Rs 1 in new year; Decision in the meeting of Pune District Co-operative Milk Association | दूध खरेदी दरात १ रुपयाने वाढ; शेतकऱ्यांना कात्रज दूध संघाकडून नवीन वर्षांची भेट 

दूध खरेदी दरात १ रुपयाने वाढ; शेतकऱ्यांना कात्रज दूध संघाकडून नवीन वर्षांची भेट 

Next

पुणे : जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादक शेतक-यांना पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून (कात्रज डेअरी ) नवीन वर्षाची अनोखी भेट दिली आहे. खाजगी दूध संघाकडून खरेदी दर कमी केला जात असताना कात्रज दूध संघाने आपल्या शेतक-यांना 1 जानेवारी पासून गायीच्या दुधासाठी प्रति लीटर 1 तर म्हैशीच्या दुधासाठी प्रति लीटर 2  रुपयांची वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचे संघाचे अध्यक्ष विष्णु हिंगे यांनी सांगितले.

खरेदी दरात वाढ केली असली तरी विक्रीच्या दरात कोणतीही वाढ केली जाणार नाही, असे हिंगे यांनी स्पष्ट केले. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची 61 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोना व्हायरस संसर्गाचे पार्श्वभूमीवर बुधवारी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा घेणारा पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ हा राज्यातील पहिला सहकारी संघ आहे.

सभेच्या सुरुवातीस  संघाचे चेअरमन विष्णु हिंगे यांनी संघाने केलेल्या कामकाजाची माहिती दिली. संघाला सन  2019-2020 या आर्थिक वर्षांत 2 कोटी 48 लाख 85 हजार इतका निव्वळ नफा झालेला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लि.1 रुपयांप्रमाणे एकूण सुमारे 6 कोटी 94 लाख रुपये दोन टप्प्यात देण्यात येणार असून,  पैकी प्रति लीटर 50 पैसे प्रमाणे होणारी रक्कम दिवाळीपूर्वी दूध उत्पादक शेतकऱ्यांना अदा केली आहे. तर उर्वरित रक्कम मार्च 2021 पूर्वी अदा केली जाणार आहे. सभेमध्ये 218 संस्था प्रतिनिधींनी सहभाग घेतला. सभेचे कामकाज अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. कोरोना कालावधीत संघाने चांगल्याप्रकारे कामकाज केल्याबद्दल सभासदांनी संचालक मंडळाचे आभार मानले. 

कोरोनाकाळातही संघाची भरभराट 

कोरोना महामारीचे काळात संघाने नियोजनपूर्वक व योग्य ती खबरदारी घेऊन कामकाज केल्याने संघाची आर्थिक घडी जास्त विस्कळीत झाली नाही. परिणामी दूध उत्पादकांचेही नुकसान झाले नाही. यावर्षी गणेशोत्सव व दीपावलीमध्ये संघाच्या मिठाई विक्रीत मोठी वाढ झाली. संघाची गणेशोत्सवामध्ये सुमारे 21 टन मोदक व पेढे व मिठाईची विक्री झाली असून दसरा सणाच्या वेळी 8 टन मिठाई 9 टन श्रीखंड/ आम्रखंड तर दीपावलीमध्ये 21 टन मिक्स मिठाईची विक्री झालेली आहे. संघाची सर्व उत्पादने गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असल्याने ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली आहेत. - विष्णू हिंगे, अध्यक्ष कात्रज दूध संघ

Web Title: Milk purchase price hike by Rs 1 in new year; Decision in the meeting of Pune District Co-operative Milk Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.