खासगी संस्था देईनात वाढीव दराने दूध
By admin | Published: July 8, 2017 02:06 AM2017-07-08T02:06:04+5:302017-07-08T02:06:04+5:30
गेल्या महिन्यात शासनाच्या विरोधात शेतकरी उतरल्यानंतर शासनाने कर्जमाफीनंतर दूधदर वाढीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शासनाने
लोकमत न्यूज नेटवर्क
लासुर्णे : गेल्या महिन्यात शासनाच्या विरोधात शेतकरी उतरल्यानंतर शासनाने कर्जमाफीनंतर दूधदर वाढीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शासनाने दूधदर २४ रुपयांवरून २७ रुपये केला आहे. परंतु, खासगी दूध संस्थांनी तोच दूधदर २७ रुपयांवरून २४ केला आहे. यामुळे शासनाच्या आदेशाला खासगी दूध संस्थांनी केराची टोपली दाखवली आहे.
शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला, तसेच याबरोबर शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दूधव्यवसाय करीत असल्याने दुधाला दर मिळावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली होती. त्यामुळे शासनाने गाईच्या दुधाचा दर २४ रुपयांवरून २७ केला आहे. परंतु इंदापूर तालुक्यात खाजगी दूध संस्थांचे जाळे पसरले आहे. या भागातील खासगी संस्थांनी दुधाचा दर २७ रुपयांवरून २४ केला असल्याने एकीकडे शासनाचा आदेश असतानाही खासगी दूध संस्था मनमानी करत असल्याचे चित्र
सध्या इंदापूर तालुक्यात पाहावयास मिळत आहे.
तरी शासनाने या
खासगी दूध संस्थांवर निर्बंध लादावेत, अशी मागणी दूध उत्पादकांमधून होत आहे.
सततच्या कमी होत असलेल्या पावसाच्या प्रमाणामुळे भीषण पाणीटंचाई जाणवत असताना शेतकरी जनावरांना ओला चारा मिळवण्यासाठी सतत धडपडत आहे. पाण्याची पातळी खोलवर गेली असल्याने ओला चारा मिळणे अडचणीचे झाले आहे.
जिथे ओला चारा मिळतोय तोही शेतकऱ्यांना चढ्या दराने घ्यावा लागत असल्याने दूधदर व खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने या भागातील पशुधन धोक्यात येते की काय, असा प्रश्न भेडसावत आहे.
दूध धंदा तरीही तोट्यातच
दुधाचा दर २७ रुपये असतानादेखील शेतकऱ्यांचा दूधधंदा तोट्यात आहे. तोच दूधदर खासगी दूध संस्थांनी २७ रुपयांवरून कमी करून २४ रुपये केला असल्याने दूधधंदा कसा करायचा, असा प्रश्न सध्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे.