Tasty Katta: रवाळ, दुधाळ, जिभेवर गोळागोळा होणारी "लाकडी पाॅट आईस्क्रीम", एकदा नक्की चाखून पहा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 11:38 AM2023-05-02T11:38:02+5:302023-05-02T11:38:39+5:30
पॉट आईस्क्रीम म्हणजे काय असे विचारले तर कोणाला सांगताही येणार नाही; पण लाकडी भांड्यातील या आईस्क्रीमला एक वेगळीच चव
राजू इनामदार
पुणे: नव्या पिढीला आईस्क्रीम म्हणजे स्कूप, फॅमिली पॅक किंवा मग कोन इतकेच माहिती आहे. किंवा फार झाले तर मटका कुल्फी किंवा त्यातलीच आईस्क्रीम. पॉट आईस्क्रीम म्हणजे काय असे विचारले तर कोणाला सांगताही येणार नाही; पण लाकडी भांड्यातील या आईस्क्रीमला एक वेगळीच चव असते. रवाळ, दुधाळ, अशा शब्दात पॉट आइस्क्रिमचे वर्णन करता येईल, मात्र ती पावडरसारखी, जिभेवर गोळागोळा होणारी, काहीशी चिकट लागणारी अशी नक्की नसते.
हा पॉट म्हणजे खास आइस्क्रिम तयार करण्याचाच पॉट. त्याचे बाहेरील आवरण लाकडी व आतील आईस्क्रीम ठेवायचा गोल डब्बा स्टील किंवा ॲल्युमिनियमचा असते. त्याच्या भोवताली रिकामी जागा असते. या मधल्या डब्यात आईस्क्रीमचे दुधाचे मिश्रण ठेवायचे. रिकाम्या जागेत मिठासह बर्फाचे तुकडे रचायचे व हा पॉट म्हणजे लाकडी ड्रम गोलगोल फिरवायचा. गोठणबिंदू तयार झाला की आत आईस्क्रीम तयार होण्याची सुरुवात होते.
अशा पॉट आईस्क्रीमपासून सुरू केलेला व्यवसाय आज तब्बल २९ ठिकाणी चालवणारे एक कुटुंब पुण्यात आहे. खत्री बंधू हे त्यांचे नाव. राजाराम पुलाजवळच्या विठ्ठल मंदिराजवळ लागणारी एक गाडी त्या मंदिरात येणाऱ्या अनेकांना आठवत असेल. गिरीश खत्री यांनी आठवीत असताना म्हणजे साधारण १९८९ मध्ये मामांपासून या पाॅट आईस्क्रिमची कला शिकून घेतली. आईने त्यांना मदत केली. राहुल व कुमार असे दोघे भाऊही मदतीला आले व हा व्यवसाय सुरू झाला. या पॉट आईस्क्रीमची चवच अशी न्यारी की मोठ्या कंपन्यांच्या स्पर्धेतही ती अजून टिकून आहे. जिथे या आईस्क्रीमचा स्टॉल लागतो तिथे कट्टा सुरू होतो. विठ्ठल मंदिराजवळ लागणाऱ्या खत्री बंधू आईस्क्रीमची आता माेठी दुकाने झाली आहेत. २५ प्रकारच्या आईस्क्रीम व १५ प्रकारच्या मस्तानी तिथे तर मिळतातच; पण आता आणखी २९ ठिकाणीही मिळतात. उपनगरांमधील खवय्यांचीही आता या पॉट आईस्क्रीमला पसंती मिळाली आहे.
कुठे: राजाराम पूल व कोथरूड, बाणेर, बालेवाडी
कधी दिवसभर व रात्रीही
आणखी काय- वेगवेगळ्या प्रकारच्या मस्तानी