औषधखरेदीत कोट्यवधीचा घोटाळा
By admin | Published: July 1, 2017 08:00 AM2017-07-01T08:00:07+5:302017-07-01T08:00:07+5:30
खुल्या बाजारात ६० ते ९० टक्के सवलत मिळत असताना महापालिकेला फक्त १९.१० टक्के सवलत देऊन कोट्यवधीची औषधखरेदी गेली
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खुल्या बाजारात ६० ते ९० टक्के सवलत मिळत असताना महापालिकेला फक्त १९.१० टक्के सवलत देऊन कोट्यवधीची औषधखरेदी गेली अनेक वर्षे केली जात आहे. यात महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत असून यापूर्वीच्या सर्व खरेदीची चौकशी करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाच्या वतीने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे करण्यात आली. या वर्षीच्या औषध खरेदीत निविदेत दुरुस्ती करण्याचे आश्वासन कुणाल कुमार यांना त्यांना दिले.
मंचाचे पदाधिकारी विवेक वेलणकर व विश्वास सहस्रबुद्धे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, की जेनेरिक औषधे ही नेहमी स्वस्त दरात विकली जातात. तीच औषधे घ्यावीत, असे सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना बंधनकारक केले आहे. ही औषधेच गेली अनेक वर्षे महापालिकेकडून दिली जात आहेत. त्या औषधांच्या खरेदीवर खुल्या बाजारात थेट ६० टक्के ते ९० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते. असे असताना महापालिका मात्र तीच औषधे फक्त १९.१० टक्के सवलतीच्या दरात खरेदी करीत आहे, असा आरोप त्यांनी केला.
मंचाच्या वतीने खुल्या बाजारातून खरेदी केलेली औषधे व महापालिकेच्या आरोग्य विभागाने ठेकेदारांकडून स्वीकारलेली तीच औषधे यांच्या किमतीतीत तफावतीचा तक्ताच वेलणकर यांनी आयुक्तांना सादर केला. दर वर्षी महापालिका किमान पाच कोटी रुपयांची औषध खरेदी करते. खुल्या बाजारात मिळणारी सवलत लक्षात घेता, हीच खरेदी केवळ अडीच कोटी रुपयांमध्ये होऊ शकते. यावरून गेली अनेक वर्षे महापालिकेला कसा गंडा घातला जात आहे, हे लक्षात येते. या सर्व प्रकरणात ठेकेदार, आरोग्य विभागातील अधिकारी यांची चौकशी करावी, अशी मागणी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली असल्याचे वेलणकर यांनी सांगितले.
निविदा जाहीर करतानाच त्यात जेनेरिक औषधे व ब्रँडेड औषधे असे दोन स्वतंत्र विभाग असावेत, अशी सूचनाही आयुक्तांना मंचाने केली. त्याला मान्यता देऊन त्यांनी आरोग्य
विभागाला तत्काळ त्याबाबत
कळविले. नुकतेच महापालिकेने
५ कोटी रुपयांची औषधखरेदीची निविदा जाहीर केली आहे. त्यात ही दुरुस्ती करण्याचे किंवा नव्याने निविदा प्रसिद्ध करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले असल्याची माहिती वेलणकर यांनी दिली.