Pune: पाणीटंचाई असताना सिंहगड रस्त्यावर लाखो लिटर पाणी वाया; पालिकेतील अधिकाऱ्यांच्या झोपा
By श्रीकिशन काळे | Published: March 22, 2024 01:15 PM2024-03-22T13:15:25+5:302024-03-22T13:15:58+5:30
एकीकडे पाणीटंचाई असताना दुसरीकडे अशाप्रकारे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने पुणेकरांनी संताप व्यक्त केला...
पुणे : गेल्या आठ दिवसांपासून सिंहगड रस्त्यावर लाखो लिटर पाणी वाया जात असून, रस्त्यावर तलाव तयार झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. आठ दिवस पु. ल. देशपांडे उद्यानाजवळील रस्त्यावर पाणी गळती होत आहे. जवळच पर्वती जलशुध्दीकरण केंद्र आहे, तरी देखील या गळतीकडे दुर्लक्ष केले जात आहे. एकीकडे पाणीटंचाई असताना दुसरीकडे अशाप्रकारे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने पुणेकरांनी संताप व्यक्त केला.
उन्हाळा सुरू झाला असून, शहरातील अनेक भागात पाणीटंचाई जाणवत आहे बोअरवेलचे पाणी आटले आहे. मात्र दुसरीकडे पाणीगळती होत असताना पुणे महापालिकेचे अधिकारी त्यावर काहीच करत नाहीत. सिंहगड रस्त्यावर रोहन कृतिका या मोठ्या सोसायटीच्या जवळ एका ठिकाणी पाणीगळती होत आहे. आठवडा झाला तरी त्याकडे कोणाचे लक्ष नाही. दुचाकी, चारचाकी वाहने साचलेल्या पाण्यातून वाट काढत पुढे जात आहेत. परंतु, स्थानिक लोकांनी कोणालाही तक्रार केली नाही आणि केली असेल तरी अधिकाऱ्यांचेही लक्ष नाही. आठवडा झाला सिंहगड रोडचा रस्ता पाण्याखाली गेला आहे.
याविषयी सजग नागरिक लोकेश बापट यांनी तिथून जाताना हे दृश्य पाहून क्षेत्रीय कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यांना एक-दोन दिवसांमध्ये त्यावर उपाय करण्यात येतील, असे सांगण्यात आले. आठवडा झाला तरी पालिका अधिकारी काहीच करत नाहीत, अधिकारी, कर्मचारी झोपले आहेत का ? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.