लाखोंचे व्हेंटिलेटर्स भंगारात! सर्व सुरू, मात्र विनावापर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 08:04 AM2022-07-13T08:04:32+5:302022-07-13T08:04:45+5:30
शहराला मिळाले हाेते ४३ व्हेंटिलेटर्स
पुणे : काेराेनाच्या पहिल्या लाटेत रुग्णांना व्हेंटिलेटर कमी पडू लागल्यानंतर केंद्राने पीएम केअर फंडमधून राज्याला शेकडाे व्हेंटिलेटर दिले. त्यापैकी ४३ व्हेंटिलेटर पुणे शहराच्या वाट्याला आले. त्यांचा काही दिवस वापर झाला, त्यापैकी काही बिघडलेही. मात्र, त्यांना परत दुरुस्त केले आहेत. हे व्हेंटिलेटर सात ते आठ महिन्यांपासून वापराविना पडून आहेत.
शहराला मिळाले हाेते ४३
पुणे शहराला दाेन वर्षांपूर्वी म्हणजे जुलै २०२० मध्ये १३ व्हेंटिलेटर मिळाले. ते व्हेंटिलेटर महापालिकेने बाणेर काेविड सेंटरला बसविले. त्यानंतर पुन्हा ३० व्हेंटिलेटर मिळाले व ते ससून हाॅस्पिटलला देण्यात आले. दुसऱ्या लाटेत त्यांचा वापर झाला. तिसऱ्या लाटेत फार थाेडा वापर झाला. आता पडून आहेत.
सर्व सुरू, मात्र विनावापर
बाणेर काेविड सेंटरमध्ये काेराेना रुग्णांसाठी २०० बेड आहेत. त्याचा उपयाेग दुसऱ्या लाटेतील रुग्णांसाठी झाला. त्यानंतर रुग्णसंख्या घटल्याने ते बंद पडले. आता बाणेर काेविड सेंटरच बंद असल्याने ते विनावापर पडून आहेत. यामध्ये जवळपास ६२ बेड हे आयसीयुसाठी आहेत. ससून रुग्णालयात केवळ तीन रुग्ण व्हेंटिलेटवर असून, उरलेले सर्व व्हेंटिलेटर पडून आहेत.
लाखो रुपयांचा चुराडा
पीएम केअर फंडमधून व्हेंटिलेटर मिळाले असले तरी ते सध्या काेणत्याही महापालिकेच्या रुग्णालयात घेण्यात आले नाहीत, तर ससूनमधील ९० टक्के विनावापर पडून आहेत. या व्हेंटिलेटरच्या रूपाने लाखाे रुपयांचा चुराडा झाल्याचे दिसून येत आहे.
दुरुस्तीसाठी तंत्रज्ञही मिळेना
ससूनमध्ये काही व्हेंटिलेटर देण्यात आले हाेते. त्यावेळी २१ व्हेंटिलेटर बंद पडले हाेते. त्यांची पुन्हा दुरुस्ती करण्यात आली. सध्या ससून रुग्णालयात २४ व्हेंटिलेटर असून, उरलेले ७ बिबवेवाडी येथील ईएसआय रुग्णालयाला देण्यात आले आहेत. मात्र, दुरुस्तीसाठी तंत्रज्ञही मिळेनात.
पुणे शहराला पीएम केअरमधून मिळालेले व्हेंटिलेटर हे बाणेर येथील काेविड सेंटरमध्ये आहेत. ते चालू स्थितीत आहेत. गरज पडल्यावर ते पुन्हा सुरू करण्यात येतील. तसेच त्यांचा मेंटेनन्स नेहमी सुरू असताे.
- डाॅ. आशिष भारती, आराेग्य प्रमुख, पुणे मनपा