’मिळून साऱ्याजणी’ ई-पोर्टल स्वरूपात आणणार : विद्या बाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 12:57 PM2019-08-17T12:57:59+5:302019-08-17T12:58:29+5:30
माणसाच्या आयुष्यातील तिशीच्या वयाचा विचार केला तर बालपण, तारूण्य ओलांडून थोडसं आपण स्थिरावत असतो. मासिकाच्या बाबत ते खरं आहे...
स्त्री-पुरूष समतेचा विचार देण्याबरोबरच ग्रामीण आणि शहरी जीवनाला जोडणारा संवाद सेतू विकसित व्हावा तसेच स्त्री चळवळीचं केवळ मुखपत्र न ठेवता स्त्रियांच्या प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारं त्यांच्या हक्काचं एक मासिक असावं, या उद्दिष्टातून सुरू झालेल्या ‘मिळून सा-याजणी’ चा प्रवास आता तिशीपर्यंत येऊन ठेपला आहे. उद्या ( शनिवारी) या मासिकाचा वर्धापनदिन साजरा होत आहे. त्यानिमित्त या मासिकाशी संपादक या नात्याने ममत्वाची नाळ जुळलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्याशी ’लोकमत’ ने संवाद साधला असता, आगामी काळात नव्या पिढीला जोडून घेण्यासाठी ‘मिळून सा-याजणी’ हे मासिक ‘ई-पोर्टल’ स्वरूपामध्ये आणण्यासाठी पावले उचलली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नम्रता फडणीस
* ‘मिळून सा-याजणी’ मासिक तिशीच्या टप्प्यापर्यंत पोहोचले आहे, या प्रवासाबददल काय सांगाल?
- माणसाच्या आयुष्यातला तिशीचा टप्पा आणि ‘मिळून सा-याजणी’ च्या आयुष्यातील तिशीच्या टप्प्यामध्ये थोडसं साम्य आणि फरक देखील आहे. माणसाच्या आयुष्यातील तिशीच्या वयाचा विचार केला तर बालपण, तारूण्य ओलांडून थोडसं आपण स्थिरावत असतो. मासिकाच्या बाबत ते खरं आहे. मात्र हा तिशीचा काळ आजच्या बदलाच्या जेट युगात इतका मोठा आहे की 1989 मध्ये जी काही परिस्थिती होती. मोबाईल नव्हते. तेव्हाचं जग माणसांना जवळ वाटणारं, संवादी असं होतं. तरीही मासिक नव्याने सुरू करण्यामागे काही अडचणी होत्या. कोणतही औद्योगिक पाठबळ नव्हतं.लोकांच्या सहभागातून हे मासिक सुरू केलं.केवळ माणसांचं प्रेम आणि पाठिंब्यामुळे हे इतकी वर्षं सुरू राहिलं. पैशाचं भांडवल नसूनही हे मासिक इतकी वर्ष चाललं ते आता मिरँकलच वाटतं.
* इतक्या वर्षात या मासिकानं काय कमावलं असं वाटत?
- मासिकानं नेहमीच साधेपणा जपला. काही उत्साहाच्या घटना आजही आठवत आहेत. सुरूवातीच्या काळात 1990 मध्ये स्त्रियांचं शिबिर घेतलं होतं. हा खरंतर वर्धापनदिनाचा कार्यक्रम असू शकत नाही. पण त्यावेळी केला जायचा. जवळपास महाराष्ट्रातून 30 ते 50 स्त्रिया आपल्या ’अधिकारा’च्या गाडीतून आल्या होत्या. याचं खूप समाधान वाटलं. त्यानंतर ‘निशब्दता ओलांडताना’ हा कार्यक्रम केला होता. ज्यांनी आत्मचरित्र लिहिली अशा लालन सारंग, देविकां सारख्या स्त्रिया आणि पुरूषांनाही बोलावले होते. आनंदाची गोष्ट वाटते की विजय तेंडुलकर, गिरीश कार्नाड, महेश एलकुंचवार यांसारखी माणसं जोडली गेली. ‘भँवरीदेवी’ हे नाव विशेषत्वाने घ्यावे लागेल. बलात्कारी बाई भ्रष्ट होत नाही तर ती जखमी होते. ती तेवढीच सन्मानी असते. हे समाजाला दाखवून देण्यासाठी तिला आमंत्रित केलं होतं.
* सोशल मीडियाच्या युगातही हे मासिक कशा पद्धतीने तग धरून उभं आहे?
-लोकसहभाग आणि सोशल मीडियाला जो प्रतिसाद मिळतो तो मासिकात मिळत नाही. त्यामुळं कालपरत्वे मासिकात बदल करणं आता भाग आहे,मात्र तोही साधेपणा कायम ठेवूनच. आज मोबाईल मुळं जगण्याला एक वेग आला आहे. लोकांना छापील वाचायची गरज वाटत नाही. त्यामुळं अनेक नियतकालिकं कमी होत आहेत. हे लक्षात घेऊन मासिकाला नव्या युगाची भाषा शिकावी लागणार आहे. मासिकात तरूणांसाठी ‘दिवाळी विभाग’ सुरू करण्यात आला आहे.
* आगामी काळात मासिक कोणत्या गोष्टींवर अधिक भर देणार आहे?
- समाजमाध्यमावर जी काही चहलपहल सुरू आहे ती पाहाता ‘मिळून सा-याजणी’चे ‘ ई-पोर्टल’ तयार करणं, सध्याचे धार्मिक उन्मादाचे वातावरण पाहाता तरूणांपर्यंत शांतीचं महत्व पोहोचविण्यासाठी त्यांचे ‘व्हॉटसअप’ ग्रृप तयार करणं. त्यांच्या समन्वयकांची बैठक घेणं. त्यांच्या समस्या आणि विचार जाणून घेणं.त्याचबरोबर ग्रामीण भागात मासिक म्हणावं तेवढं पोहोचलं नाहीये. त्यासाठी बचत गटांची स्पर्धा घेणं अशा अनेक गोष्टींवर भर दिला जाणार आहे.