काँग्रेसने दाखविला मनाचा मोठेपणा
By admin | Published: March 6, 2016 01:18 AM2016-03-06T01:18:43+5:302016-03-06T01:18:43+5:30
स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नाशिकच्या बदल्यात मनसेची मदत घेणार, ठाकरे बंधू स्थायी समितीचा अध्यक्ष ठरविणार
पुणे : स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नाशिकच्या बदल्यात मनसेची मदत घेणार, ठाकरे बंधू स्थायी समितीचा अध्यक्ष ठरविणार, या सर्व शक्यता फोल ठरवीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षांनी आघाडी कायम ठेवीत महापालिकेमध्ये एकीचे दर्शन घडविले आहे. राष्ट्रवादीने एका वर्षासाठीही स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्यास नकार दिला असतानाही काँग्रेसने मनाचा मोठेपणा दाखवून राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली. त्याबदल्यात ३ समित्या व प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद देण्याचा शब्दही पदरात पाडून घेतला.
स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाळासाहेब बोडके, काँग्रेसकडून अविनाश बागवे, तर भाजपाकडून राजेंद्र शिळीमकर यांनी उमेदवारांनी अर्ज भरले होते. स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ६, काँग्रेस, मनसे व भाजपाचे प्रत्येकी ३, तर शिवसेनेचे १ असे बलाबल आहे. राष्ट्रवादीला अध्यक्षपदी उमेदवार निवडून आणण्यासाठी किमान एका पक्षाचा पाठिंबा मिळवावाच लागणार होता.
राष्ट्रवादीने ४ वर्षे स्थायीचे अध्यक्षपद घेतल्यानंतर किमान एका वर्षासाठी तरी अध्यक्षपद देऊन राष्ट्रवादीने आघाडी धर्म पाळावा, अशी अपेक्षा काँग्रेस पक्षाकडून केली जात आहे. राष्ट्रवादीने तसा शब्द दिला असल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात होता. तर, दुसरीकडे पुढचे वर्ष निवडणुकीचे असल्याने स्थायीचे अध्यक्षपद आपल्याकडेच ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात होता. त्यामुळे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक रंगतदार बनली होती. काँग्रेसच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेऊन यंदा अध्यक्षपदाची संधी काँग्रेसला देण्याची मागणी केली; मात्र त्याला पवार यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नाराज झालेली काँग्रेस काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करण्यासाठी भाजपाच्या उमेदवारास मतदान करण्याचा एक पर्याय काँग्र्रेसकडे होता. मात्र, त्यातून राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवरही चुकीचा संदेश गेला असता. त्यामुळे ती शक्यता फेटाळून लावण्यात आली. काँग्रेसने उमेदवारी कायम ठेवून निवडणूक लढविली असती, तरी राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडून आला असता. त्यामुळे अखेर राष्ट्रवादीला पाठिंबा देऊन ३ समित्या व काही प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद पदरात पाडून घेण्याची शहणपणाची खेळी काँग्रेसकडून खेळली गेली.