मिनरल वॉटर कंपन्यांना अभय

By admin | Published: April 11, 2016 12:49 AM2016-04-11T00:49:04+5:302016-04-11T00:49:04+5:30

शहरामध्ये बेकायदेशीरपणे महापालिकेच्या पाण्याची चोरी करून, बेकायदेशीरपणे टँकर घेऊन पाण्याची विक्री करणाऱ्या मिनरल वॉटर कंपन्यांना महापालिकेच्या प्रशासनाचेच अभय असल्याचे स्पष्ट झालेले आहे

Mineral water companies abbey | मिनरल वॉटर कंपन्यांना अभय

मिनरल वॉटर कंपन्यांना अभय

Next

पुणे : शहरामध्ये बेकायदेशीरपणे महापालिकेच्या पाण्याची चोरी करून, बेकायदेशीरपणे टँकर घेऊन पाण्याची विक्री करणाऱ्या मिनरल वॉटर कंपन्यांना महापालिकेच्या प्रशासनाचेच अभय असल्याचे स्पष्ट झालेले आहे. मिनरल वॉटर कंपन्यांविरुद्ध पुराव्यानिशी तक्रार होऊन १५ दिवस उलटले तरी अद्याप त्यांच्याविरुद्ध पाणीपुरवठा विभागाकडून कोणतीच ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
शहरामध्ये ८५ मिनरल वॉटर कंपन्यांकडून बेकायदेशीरपणे प्लांटची उभारणी करून पाण्याची विक्री केली जात आहे. या कंपन्यांनी एफडीएकडे त्यांची नोंदणी केलेली नाही, त्यांच्या पाण्याच्या दर्जाची तपासणी केली जात नाही. कोणतेही निकष न पाळता पाणी बाटलीबंद करून त्यांची शहरामध्ये तसेच शहराबाहेर विक्री केली जात आहे. या कंपन्यांविरुद्ध रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे गटनेते सिद्धार्थ धेंडे यांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. मात्र, तक्रार करून १५ दिवस उलटले तरी अद्याप त्यांच्यावर झालेल्या कारवाईचा तपशील पाणीपुरवठा विभागाकडून जाहीर करण्यात आलेला नाही.
शहराच्या पाण्यात ३० टक्के कपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाण्याचा गैरवापर सुरू असल्यास दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे मिनरल वॉटरची विक्री करणाऱ्या कंपन्या चोरून कनेक्शन घेऊन तसेच टँकर खरेदी करून पाण्याचा वापर करीत आहेत.
शहरामध्ये हॉटेल व्यावसायिक तसेच इतर व्यावसायिक कारणासाठी पाणी हवे असेल तर महापालिकेकडून पर हजार लिटर ३३ रुपये दराने पाणी उपलब्ध करून दिले जाते. मिनरल वॉटर कंपन्यांनी या दराने पाणीखरेदी करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ते टँकर, बोअरवेल, विहिरीच्या पाण्याचा वापर करीत आहेत. कंपन्यांची यादी, पत्ते, पाण्याचा गैरवापर होत असल्याचे व्हिडीओ सिद्धार्थ धेंडे यांनी पाणीपुरवठा विभागाला देऊनही अद्याप त्यांच्यावर काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे प्रशासनाकडूनच या कंपन्यांना अभय मिळाला असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
अन्न व औषध प्रशासनाने अशा नोंदणी नसलेल्या कंपन्या शोधून त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित असतानाही त्यांच्याकडून मिनरल वॉटर कंपन्यांकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.

Web Title: Mineral water companies abbey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.