खाणमालकांचे धाबे दणाणले
By admin | Published: October 15, 2015 12:59 AM2015-10-15T00:59:24+5:302015-10-15T00:59:24+5:30
हवेली महसूल विभागाने गौणखनिजाची अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्या २०० पेक्षा जास्त गाड्यांवर कारवाई केली. त्यामुळे बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांची अक्षरश
लोणी काळभोर / वाघोली : हवेली महसूल विभागाने गौणखनिजाची अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्या २०० पेक्षा जास्त गाड्यांवर कारवाई केली. त्यामुळे बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांची अक्षरश: पळता भुई थोडी झाली. खाणमालकांचे धाबे दणाणले
आहेत.
हवेलीचे तहसीलदार दगडू कुंभार, महसूल नायब तहसीलदार समीर यादव यांच्या पथकाने तालुक्यात विविध ठिकाणी कारवाई केली.
बहुतांश खाणमालकांनी रॉयल्टी भरलेली नाही, परवान्यांचेही नूतनीकरण केलेले नाही. काही खाणमालकांनी रॉयल्टीबाबत दिलेले धनादेशही वटलेले नाहीत. याकामी संबंंधितांना वारंवार सूचना व नोटीसही बजावण्यात आल्या होत्या. मात्र, याकडे दुर्लक्षच होत असल्यामुळे ही धडक कारवाई करण्यात आली.
अनधिकृत वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये खडी व क्रशसँड मोठ्या प्रमाणावर आढळून आली. वाहतूक करताना गौणखनिज आच्छादित नव्हते. काही वाहनधारकांकडे असलेल्या परवाना पावत्यांची तपासणी करण्यात आली.
ज्या वाहनधारकांनी शासनाच्या नियमानुसार दंडात्मक रक्कम भरली आहे, त्यांचे वाहन दंड आकारून सोडण्यात आले.
ज्या वाहनधारकांकडे कोणत्याही स्वरूपाचा परवाना आढळून आला नाही व दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ केलेली आहे, त्या वाहनचालकांचा जबाब, पंचनामा, जप्तीनामा तयार करून संबंधित वाहने लोणी कंद पोलिसांकडे सुपूर्द केल्याची माहिती महसूल अधिकाऱ्यांनी दिली.
खराडी बायपासजवळ ३० गाड्या कारवाई करण्यासाठी ताब्यात घेतल्या. वाघोलीतील वाघेश्वर मंदिर परिसरात ४५ वाहने ताब्यात घेतली असून, बहुतांशी वाहनांमध्येच गौणखनिज ताडपत्रीने झाकलेले नसल्याचे आढळून आले.
लोणी कंद परिसरात २० तर खेड शि२वापूर परिसरात ३९ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली.
(वार्ताहर)