Lockdown in Baramati : बारामतीत ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद, व्यापारी वर्ग नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 01:22 PM2021-04-06T13:22:30+5:302021-04-06T13:41:12+5:30

अचानक दुकाने बंद केल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ

Mini Lockdown in Baramati: All shops in Baramati closed till April 30 except essential services under 'Break the Chain', traders angry | Lockdown in Baramati : बारामतीत ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद, व्यापारी वर्ग नाराज

Lockdown in Baramati : बारामतीत ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद, व्यापारी वर्ग नाराज

googlenewsNext

बारामती: पुणे शहराप्रमाणे पुणे जिल्ह्यात देखील जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी रात्री उशिरा अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण दुकाने बंद करण्याचा आदेश पारित करण्यात आला. सकाळी दहाच्या सुमारास बारामती शहरातील व्यापाऱ्यांना या आदेशान्वये सर्व दुकाने बंद करण्यास स्थानिक प्रशासनाने सांगितल्यानंतर शहरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. तसेच अचानक बंद कसे करता काही तरी सवलत द्या, अशी मागणी करत व्यापाऱ्यांनी या बंदला कडाडून विरोध केला.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग, ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती आदी हद्दींमध्ये ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत ३० एप्रिल पर्यंत संचारबंदी वाढवण्याचा आदेश देण्यात आला आहे. मंगळवारी (दि. ६) सकाळी दहाच्या सुमारास या आदेशान्वये बारामती येथील स्थानिक प्रशासनाने अत्यावश्याक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. अचानक आलेल्या या नव्या आदेशामुळे व्यापारी व किरकोळ विक्रेत्यांना धक्का बसला. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. हा आदेश म्हणजे व्यापाऱ्यांचे
कंबरडे मोडणारा आहे अशा शब्दात व्यापाऱ्यांनी शासनाच्या निर्णयावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. 


बारामती शहरात मंगळवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. विश्वासात न घेता तसेच पूर्व कल्पना न देता अचानक दुकाने बंद करायला लावल्याने व्यापाऱ्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली. तसेच दुकाने बंद झाल्याने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची देखील तारांबळ उडाली. असे असले तरी बारामती शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. 

तत्पूर्वी ३ एप्रिलपासून बारामतीमध्ये अंशत: संचारबंदी लागू केली होती. मात्र तरी देखील कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने प्रशासन कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत होते. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकिमध्ये देखील कडक निर्णय घेण्याचे सुतोवाच केले होते.

मागील वर्षाच्या संचारबंदीमुळे व्यापारीवर्ग अजुनही आर्थिक संकटात आहे.आता नव्याने संचारबंदी लागू केल्यामुळे व्यापाऱ्यांचे कंबडरे मोडणार आहे.प्रचंड आर्थिक नुकसानीला आम्हाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे आठ दिवस बंद त्यानंतर चार-पाच दिवस दुकाने सुरू करू द्यावीत. काही दिवसांवर गुढीपाडवा आला आहे. व्यापारीवर्गासाठी हा सण महत्त्वाचा असतो. त्यामुळे प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या अडचणी समजुन घ्यायला हव्यात.
- नरेंद्र गुजराथी, अध्यक्ष, बारामती व्यापारी संघ.

शासनाच्या आदेशानुसार बारामतीतील दुकाने बंद करण्यात आली आहेत. हा आदेश स्थानिक प्रशासनाचा नाही. त्यामुळे व्यापारी वर्गाने सहकार्य करावे.
- दादासाहेब कांबळे, उपविभागीय अधिकारी, बारामती.
-----------------------------

Web Title: Mini Lockdown in Baramati: All shops in Baramati closed till April 30 except essential services under 'Break the Chain', traders angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.