पुण्यातील मिनी लॉकडाऊनमुळे पुणेकरांचे आर्थिक कंबरडे मोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 07:23 PM2021-04-02T19:23:56+5:302021-04-02T19:24:35+5:30
भाजपा नेत्याची प्रशासनावर टीका
पुणे प्रशासनाच्या वतीने सायंकाळी ६ ते सकाळी ६ असा मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या अन्यायकारक निर्णयाने पुणेकरांचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे. अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे.
पुणे शहरात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला पाहिजे. ऑक्सिजन आणि साधे बेड, व्हेंटिलेटर, लसीकरणाचा वेग आणि चाचण्या वाढवणे आवश्यक होते. मिनी लॉकडाऊन मुळे व्यापारी, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या श्रमिकांचे हाल होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
प्रशासनाने लॉकडाऊन टाळून निर्बंध कडक करण्याच्या उद्देशाने सायंकाळनंतर संचारबंदी लागू केली आहे. परंतु व्यापारी वर्गाबरोबरच अन्य सर्वच स्तरावरून संचारबंदीला विरोध होऊ लागला आहे. व्यापारी वर्गाकडूनही या निर्णयावर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्यांनीही या मिनी लॉकडाऊनच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
सार्वजनिक वाहतूक बंद ठेवल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कामगारांचे मोठे नुकसान होणार आहे. पीएमपीमध्ये हजारो कामगार कार्यरत आहेत. त्यांना रोजगारापासून मुकावे लागणार आहे. त्यांना रोजगाराला मुकावे लागणार आहे. तसेच धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याने भाजपा त्याचा तीव्र विरोध करत आहे. असेही त्यांनी सांगितले.