पुण्यातल्या टेकड्यांवर करा मिनी ट्रीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 03:49 PM2018-04-27T15:49:51+5:302018-04-27T15:51:40+5:30
पुणे शहरात अनेक टेकड्या आहे. मुलांच्या सुट्ट्यांमध्ये कमी वेळात ट्रीप करायची असेल तर हा पर्याय ट्राय करा.यामुळे शरीराचा व्यायाम तर होईलच पण शहराचा भूगोल समजण्याशी मदत होईल.
पुणे : ज्या शहरात नदी आणि टेकड्या आहेत ते शहर भौगोलिकदृष्टीने परिपूर्ण मानले जाते. पुणे शहराचा यात समावेश होत असून काही तासांची मिनी ट्रीप करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. सध्या वाढत्या उन्हाळ्यामुळे काही तासांचा रिफ्रेश करणारा ब्रेक हवा असेल तर टेकड्यांवर नक्की जा.
वेताळ टेकडी :
पुण्यात पौड रस्त्यावर असणारी वेताळ टेकडी एआरएआय टेकडीच्या नावानेही ओळखली जाते. साधारण २६०० फूट उंचीवर असणारी ही टेकडी शहरातील सर्वात उंचीवरचे ठिकाण मानले जाते. इथे अनेक दुर्मिळ पक्षीही बघायला मिळतात. सकाळी सूर्योदयाची वेळ ही या ठिकाणी जाण्याची सर्वोत्तम वेळ आहे. इथे जाताना घरून डबे घेऊन गेल्यास तीन-चार तासाची रिफ्रेश करणारी ट्रीपही होऊ शकते.
बाणेर टेकडी :
बाणेर आणि पाषाण गावांना विभागण्याचे काम बाणेर येथील टेकडी करते. २२२४ फूट उंचीवर असलेली ही टेकडी शहरातील उंचीच्या दृष्टीने तिसऱ्या स्थानावर आहे. या टेकडीवर जाण्यासाठी तब्बल पाच रस्ते असून इथले तापमान हिरवळीमुळे शहरापेक्षा कायम १ ते २ अंशांनी कमी असते. आल्हाददायक हवा आणि निसर्गसौंदयाने नटलेला हा भाग मनाला नवा तजेला देतो.
पर्वती :
हे पुण्यातले प्रसिद्ध ठिकाण असून इथे सकाळी आणि संध्याकाळी फिरायला येणाऱ्यांची कायम गर्दी असते. पर्वतीची उंची साधारण २१०० फूट आहे. पर्वतीला एकूण १०३ पायऱ्या आहेत. पर्वतीवर देवदेवेश्वराच्या मुख्य मंदिराशिवाय कार्तिकेय, विष्णू, विठ्ठल- रुक्मिणी आदी मंदिरे आहेत. आबाल-वृद्ध असेही कोणीही पर्वती सहज चढू शकतात.
चतुःशृंगी टेकडी :
सेनापती बापट रस्त्याकडून विद्यापीठ रस्त्याकडे जाताना असणारे चतुःशृंगी मंदिर टेकडीवर वसलेले आहे. ही टेकडी बाणेर टेकडीला जोडलेली असून काही तासांच्या सहलीसाठी चांगला पर्याय आहे. मंदिराच्या बाजूने पायऱ्यांनी न चढता थेट टेकडी चढायला सुरुवात केली असता वरपर्यंत चालत जाण्याची सोय आहे. इथे व्यायामप्रेमींची गर्दी असते.
तळजाई टेकडी :
पुण्यात हिरवळ शिल्लक असलेल्या भागापैकी असलेली तळजाई टेकडी. टेकडीच्या वरपर्यंत जाण्यास रस्ता असून तिथे फिरायला येणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. या ठिकाणी फिरण्यास ५ ते १० आणि संध्याकाळी ४. ३० ते ७ परवानगी आहे. या टेकडीवर तळजाईचे मंदिर आहे.इथे अनेक पक्षी बघायला मिळत असून हे पक्षी निरीक्षकांचे आवडते ठिकाण आहे.