म्युकरमायकोसिसवरील किमान खर्च आठ लाख; शासनाची मदत दीड लाखाची !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:11 AM2021-05-26T04:11:28+5:302021-05-26T04:11:28+5:30
''म्युकरमायकोसिस'' या रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता या आजाराचा शहरी गरीब योजनेमध्ये समावेश करण्याचा निर्णय पुणे महापालिकेतर्फे घेण्यात आला आहे. ...
''म्युकरमायकोसिस'' या रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता या आजाराचा शहरी गरीब योजनेमध्ये समावेश करण्याचा निर्णय पुणे महापालिकेतर्फे घेण्यात आला आहे. या आजारावरील उपचारांसाठी तीन लाखांपर्यंत पालिका मदत करणार आहे. शहरातील १४० रुग्णालयांमध्ये या आजारावर उपचार घेता येणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंर्तगतही म्युकरमायकोसिसचे उपचार समाविष्ट करण्याची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्यक्षात ही मदत कधी आणि कशी मिळणार, असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांकडून विचारला जात आहे.
खासगी रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार किंवा शासन ठरवेल त्या दराने बिल आकारावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ॲम्फोटेरोसिन इंजेक्शनचे ६० हजार व्हायल्स १ जून रोजी राज्याला उपलब्ध होणार आहेत. या आजारावर मोफत उपचार झाले पाहिजेत अशा सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने ३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली.
-----
म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यातील रुग्ण - ३५३
मृत्यू - २०
----
एका रुग्णाचा खर्च आठ ते दहा लाख
म्युकरमायकोसिसच्या उपचारात ॲम्फोटेरोसीन-बी या इंजेक्शनचा वापर केला जातो. त्याची ५० मिलिग्रॅमची एक व्हायल २५०० ते ३००० रुपयांना पडते. अंदाजे ७० किलोग्रॅम वजन असलेल्या व्यक्तीला दिवसाला सहा ते दहा व्हायलची गरज भासते. याचा अर्थ इंजेक्शनचा दिवसाचा खर्च ३० ते ५० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो. ही उपचार पद्धती पंधरा दिवसांपर्यंत चालते. म्हणजेच हा खर्च सात ते आठ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
-----
म्युकरमायकोसिसच्या उपचारांचा खर्च महात्मा फुले योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे. खर्च वाढल्यास तो राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत संबंधित रुग्णालयास मंजूर करण्यात येईल, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
- डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्य चिकित्सक