पुण्याच्या किमान तापमानात दुपटीने वाढ; हिवाळ्यात उन्हाळ्याचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 01:39 PM2019-12-27T13:39:04+5:302019-12-27T13:43:12+5:30
२५ वर्षांतील सर्वाधिक जास्त किमान तापमान
पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गुरुवारी पुण्यात सकाळी दाट धुके, पावसाची मधूनच येणारी सर आणि त्यानंतर दिवसभर वाढता उष्मा, असा अनुभव पुणेकरांना आला़. हिवाळ्यात सर्वांत कमी किमान तापमान किती, याची नोंद प्रामुख्याने हवामान विभागाकडून ठेवली जाते़. हिवाळ्यात किमान तापमानातील सर्वाधिक तापमान किती, याची कधीही चर्चा होताना दिसत नाही़.
गुरुवारी मात्र पुणे शहराच्या सरासरी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे़. पुणे शहरात गुरुवारी सकाळी २१़४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती़. ती सरासरीच्या तुलनेत तब्बल १०़६ अंश सेल्सिअसने अधिक होती़ गेल्या १० वर्षांत डिसेंबर महिन्यातील किमान तापमान हे नेहमीच १० अंशांच्या खाली (सिंगल डिजीट) राहत आले आहे़. या डिसेंबरमध्ये आतापर्यंत किमान तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेले होते़.
अरबी समुद्रात सातत्याने वातावरणात बदल होत असल्याने यंदा पुणे शहरासह राज्यातील किमान तापमान चढेच राहिले आहे़. गेल्या वर्षी २९ डिसेंबर २०१८ रोजी सर्वांत कमी ५़९ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविले गेले होते़.
पुण्यासह अनेक ठिकाणी सकाळी नागरिक फिरायला जाताना नेहमी मफलर, कानटोपी, स्वेटर असा जामानिमा करून घरातून बाहेर पडत असत. डिसेंबर महिनाअखेरीस तर किमान तापमानात मोठी घट झालेली असते़. यंदा मात्र, लोकांना अजूनही स्वेटर, कानटोपी बाहेर काढण्याची गरज पडली नाही़. गुरुवारी सकाळी सूर्यग्रहण पाहण्यासाठी उत्साही पुणेकरांना पावसाची सर अंगावर घेत बाहेर पडावे लागेल़ शहराच्या अनेक भागात सकाळी उशिरापर्यंत दाट धुक्याचा अनुभव आला. त्यानंतर सकाळी ९ नंतर उन्हाळ्यात जाणवावा, असे उकाडा जाणवत होता.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शुक्रवारी व शनिवारी २७ व २८ डिसेंबरला आकाश अंशत: आकाश ढगाळ राहील. २९ व ३० डिसेंबर रोजी आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची शक्यता असून अत्यल्प स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे़.
....
हवामान विभागातील कर्मचाऱ्यांच्या आजवरच्या अनुभवानुसार यंदा प्रथमच डिसेंबरमध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दुप्पट वाढ झालेली दिसत आहे. तसेच, डिसेंबर महिन्यात १० अंशांच्या खाली किमान तापमान न जाण्याचा हा आपल्या २५ वर्षांच्या कार्यकाळात प्रथमच अनुभवत असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
............
रविवार, सोमवारी पावसाची शक्यता
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून विदर्भासह मध्य महाराष्ट्र, कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. २९ व ३० डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़.