भामा-आसखेड धरणातच खोदताहेत खाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2016 01:32 AM2016-05-30T01:32:03+5:302016-05-30T01:32:03+5:30
ठेकेदारीच्या माध्यमातून मिळविलेल्या कामासाठी लागणारे मटेरियल चक्क धरणाच्या जलाशयात खाण पाडून काढले जात आहे.
आंबेठाण : ठेकेदारीच्या माध्यमातून मिळविलेल्या कामासाठी लागणारे मटेरियल चक्क धरणाच्या जलाशयात खाण पाडून काढले जात आहे. तेदेखील कुठलीही शासकीय किंमत न भरता आणि विनापरवानगी वापरून लाखो रुपयांचा घोटाळा करण्याचा प्रकार सध्या खेड तालुक्यात सुरू आहे. एकप्रकारे दिवसाढवळ्या ही लूटच सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे अधिक नफा शिल्लक राहावा म्हणून बेलगाम होत चाललेल्या अशा ठेकेदारांना योग्य वेळेत चाप बसण्याची गरज निर्माण झाली आहे.
शिवे (ता. खेड) येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून नागोबाची वस्ती या ठिकाणाकडे जाण्यासाठी रस्त्याचे काम सुरू आहे. त्याठिकाणी खडीकरण आणि मुरुमीकरणाचे काम केले जात आहे. हे सुरू असणारे काम २५-१५ (ग्रामविकास निधी) मधून केले जात आहे. त्यासाठी ५ लाखांचा निधी आहे. परंतु या ठिकाणी वापरली जाणारी खडी ही भामा-आसखेड धरणाच्या जलाशयात खोदाई करून काढली जात आहे. त्यासाठी धरणाच्या जलाशयात चक्क खाण पाडली असून, त्यामधून ट्रॅक्टर आणि मजूर लावून खोदाई करून खडी पाडली जात आहे. धरणाच्या जलाशयात एखाद्या डोंगराचा कडा असावा, अशाप्रकारे या ठिकाणी खोदाई सुरू आहे. याशिवाय या रस्त्याच्या कामासाठी वापरला जाणारा मुरुमदेखील आजूबाजूच्या जागेतूनच काढला जात असून, तोदेखील अगदी मातीमिश्रीत वापरला जात आहे. त्यामुळे या कामासाठी वापरला जाणारा सर्व मालच झोलझाल करून मिळविला जात असल्याचा प्रकार या ठिकाणी घडत आहे.
सर्व माल निकृष्ट आणि फुकटचा वापरायचा आणि त्या माध्यमातून लाखो रुपयांचा माल कमवायचा, असा प्रकार या ठिकाणी घडत आहे. या ठिकाणी धरणाच्या जलाशयात खाण पाडून खडी उपसा केला जात असतानादेखील प्रशासन गप्प का? असा प्रश्न निर्माण होत आहे. यामागे काही अधिकाऱ्यांचे हितसंबंध आहेत का? यात कोणा पुढाऱ्याचे हात गुंतले आहेत का? याचा सखोल विचार होणे अतिशय गरजेचे आहे.
आज धरणाच्या जलाशयात खाण पाडली जात आहे. उद्या अशा लोकांचे असेच फावत गेले, तर यापुढची पायरी ते गाठतील आणि मग निश्चितच गोंधळ वाढेल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अशा बेलगाम ठेकेदारांना योग्य वेळेत वठणीवर आणून त्यांना कायदा आणि नियम काय असतात, याची जाणीव करून देणे गरजेचे आहे.