राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंना 100 रुपये दंड, ग्रामपंचायतीत फाडली पावती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2020 09:25 PM2020-11-01T21:25:25+5:302020-11-01T21:26:54+5:30
कार्यक्रमात तोंडावरील मास्क निघाल्याने फाडली दंडाची पावती, लासुर्णे ग्रामपंचायतीने फाडली पावती
बारामती : कोरोना संकटाच्या पार्श्वभुमीवर सुरु असणारा ‘लॉकडाऊन’बराचसा शिथील करण्यात आला आहे.मात्र, कोरोनाचे संकट अद्याप कायम आहे.त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे. या नियमावलीचे पालन करताना नागरीक उदासीन असल्याचे दिसुन येते.मात्र, जंक्शन (ता. इंदापुर) येथील खासगी कार्यक्रमात भाषण सुरु असताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा तोंडावरील मास्क अनावधानाने निघाला.मात्र,त्याची जबाबदारी स्वीकारत राज्यमंत्री भरणे यांनीभाषणानंतर भरणे यांनी स्वत:हून विनामास्कचा शंभर रुपयांचा दंड लासुर्णे ग्रामपंचायतीकडे भरला. त्याची रीतसर पावती घेतली. कोरोनाच्या काळात भरणे यांनी आदर्श वस्तुपाठ मांडला आहे.त्याची आज सर्वत्र चर्चा होती.
इंदापूर तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.तुलनेने कोरोनाच आलेख घसरत असला तरी कोरोना हद्दपार करण्यासाठी शासकीय नियमावलीचे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे. सातत्याने सॅनिटायझरचा वापर,सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर या मुलभूत नियमांसाठी प्रशासनाचा आग्रह आहे. त्यासाठी पोलीस, ग्रामपंचायत,नगरपालीका प्रशासन आग्रही आहे.ठिकठिकाणी दंडात्मक कारवाई सुरु आहे.या कारवाईच्या भीतीने का होईना सर्वत्र नियमावलीचे पालन होताना दिसत आहे. मात्र, दिवाळी सण तोंडावर आला आहे. त्यामुळे बाजारात मोठी गर्दी वाढत आहे.त्याला इंदापुर तालुका देखील अपवाद नाही.मात्र,हीच जबाबदारीची वेळ आहे.गर्दी वाढत असताना कोरोना रोखण्यासाठी आवश्यक दक्षता घेण्याचे सामाजिक भान सर्वांनीच जपण्याची नितांत गरज आहे. राज्यमंत्री भरणे यांनी रविवारी(दि.१) हा संदेश दिला आहे.
राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते जंक्शन येथील एका खासगी दुकानाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी काही नागरिक विनामास्क कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होते.राज्यमंत्र्यांच्या नजरेतुन हि बाब सुटली नाही. यावेळी भरणे यांनी नागरिकांना कोरोना अद्याप गेलेला नाही. आवश्यक नियमावलीचे पालन करा, सोशल डिस्टन्स पाळा, मास्क वापरा, असे आवाहन करत साद घातली. याचवेळी अनावधानाने भरणे यांच्या तोंडावरील मास्क खाली आला. मात्र, हीदेखील चूक आहे. मंत्र्यांनादेखील नियम बंधनकारक आहेत. याच जाणिवेतून भाषणानंतर भरणे यांनी स्वत:हून विनामास्कचा शंभर रुपयांचा दंड लासुर्णे ग्रामपंचायतीकडे भरुन त्याची रितसर पावती फाडली. यावेळी वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, मोहन ठोंबरे, लक्ष्मण साळवे उपस्थित होते.